कोरोनाला गुडघे टेकायला
लावणाऱ्या शहरांचा स्वभाव
.....................................
- कांतीलाल कडू
.....................................
प्रचंड दहशतीखाली गेले काही दिवस अक्खे कामोठे शहर होते. अजूनही धोका टळला आहे असा दावा कुणी करणार नाही. परंतु, महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहराला कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केले होते ते निर्बंध उठवण्यात आले आहेत. महापालिकेने तसे आदेश काढून कामोठे शहरातील निर्बंध हटवले आहेत. पण महापालिका क्षेत्र आणि पनवेल तालुका रेड झोनमधून अद्याप बाहेर आलेला नाही, याचे भान ठेवावे लागणार आहे. एक मात्र झाले की, कोरोनाची दहशत कायम असली तर बाधित क्षेत्राचे नागरिकांच्या मानेवरचे जुकाड काढले गेले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाचे शहर असा डाग लागला आणि तो काही दिवसात गडद होत गेला. कालपर्यंत तिथे 157 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कामोठे हे हॉटस्पॉट ठरले. तसे पाहिले तर गेली अनेक वर्षे कामोठे शहर महापालिकेतील इतर शहरांच्या तुलनेने सतत वर्तमानपत्रांतील हक्काच्या रकान्यातले एक शहर म्हणून वाजत गाजत आले आहे. शांत वाटणाऱ्या शहराला दृष्ट लागावी अशा अनेक अप्रिय घटनांचा आलेखही तिथे उंचावताना दिसतो. इतर चांगल्या, वाईट घटनांप्रमाणे कोरोनाची सुद्धा याच शहरावर सर्वाधिक प्रिती जडावी हे दुर्दैव म्हणावे लागेल. आता तेथील रुग्णांचा आकडा पाहता 94 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अठरा जणांना लढाई अर्धवट सोडून परलोकीचा मार्ग धरावा लागला आहे. अजून 34 जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे कळते. तेसुद्धा ठणठणीत बरे होऊन लवकरच घरी परततील.
कोरोनाने कामोठेकारांची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरवूनच हल्ला चढविला. मोठ्या जिद्दीने तेथील नागरिक एकसंघपणे लढत आहेत. अनेक सामजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, मोजके राजकीय पदाधिकारी कार्यरत आहेत. दुर्दैवाची बाब अशी की, निवडणुकीत चौकाचौकात कुत्र्याच्या छत्रीसारखी उगवलेली पक्षीय कार्यालये कोरोनाबाधितांच्या सेवेत कुणाच्याही दृष्टीस पडली नाहीत. तशी ती महापालिका क्षेत्रात कुठेच दिसली नाहीत. नाही दिसले पगारी कार्यकर्ते. थोड्याफार प्रमाणात धान्य वाटपाचे इव्हेंट घडवून आणले. या व्यतिरिक्त कुणीही मसिहा बनून कामोठेकरांचे अश्रू पुसायला आले नाहीत. हा काळ निवडणुकीचा असता तर घराघरात जावून मतदारांची डोकी मोजून घेतली असती. दहा, दहा कार्यकर्त्यांकडे इमारतींची जबाबदारी दिली गेली असती. त्याबदल्यात त्यांना पगार, इतर मेहनताना, पार्टी आणि सगळंच पुरवले गेले असते. पण, कोरोनाची साथ सुरू असताना सुरुवातीपासून काही जण अंगावर गोधडी लपेटून झोपले होते, घरी. लोकांनी सोशल मिडियावरून ' आपण यांना पाहिलत का ' अशी जाहिरात देण्यास सुरुवात केल्याने अनेक जण बाहेर येऊन. मगरीचे अश्रू ढाळत आहेत. अक्षरश: महापालिकेचे सत्ताधारी, विरोधीपक्षाने नागरिकांचा भ्रमनिरास केला यावेळी. संकटात हात आखडता घ्यायचा आणि गणेशोत्सव, नवरात्रीत काही मंडळांना वशीकरण करून खुश केल्यावर अख्या शहरात नावलौकिक मिळवता येते, ही नवी थेअरी मांडली जात असल्याने लोकप्रतिनिधी नागरिकांना तुच्छ ठरवू लागले आहेत. म्हणूनच नगरसेवक, महापौर, उपमहापौर, आमदार, त्यांचे नेते कुठेच दिसत नाहीत संकटात.
अशा स्थितीत कामोठे फार कठीण परिस्थितीला सामोरे जात आहे. त्या पाठोपाठ 81 रुग्णांचे खारघर आहे. आता तिकडे 34 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 53 जणांनी रोग प्रतिकार शक्ती वाढवून कोरोनाला गुडघे टेकायला लावले आहेत. दोघे जण मात्र या युद्धात हरले आहेत. खारघरची नागरी वस्ती ही वरच्या पट्टीतील आहे. त्यांचे साधे बोलणेही काली सहामध्ये असल्याने ते नेहमीच सुरात बोलतात, पुणेकरांच्या एक पाऊल पुढे जावून. माणसं मात्र फणसासारखी, वरून काटेरी पण आतून गोड आहेत.
कामोठेकर बिच्चारे पक्के आशावादी. कुणीही यावे आणि मुकी गाय हाकावी, असे वरवर वाटत असले तरी ते तसे नाहीत. ते सुद्धा पक्के स्वाभिमानी आहेत. तेव्हा कुणी ओंजळ रिकामी करण्याची ते वाट पाहणाऱ्यातले नाहीत. सरळसाधा भाव, प्रेरणादायी लोकं राहतात तिथे.
नवीन पनवेल आणि कळंबोली धोक्याची घंटा वाजवत आहे. नवीन पनवेलमध्ये 62 रुग्ण आहेत. तर कळंबोलीने 60 रुग्ण दिले आहेत. नवीन पनवेलमध्ये 30-30 सहभाग आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचार घेत असलेले रुग्ण सामान आहेत. इथेसुद्धा दोघांनी कोरोनाशी लढताना हार पत्करली. कळंबोलीत मात्र, चौघांना कोरोनाने हरवले आहे. 35 जणांची घरवापसी झाली आहे. अजून गणपतीचे 21 मोदक डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. ते सगळे सुरक्षित आहेत. कळंबोली आणि नवीन पनवेलची वस्ती प्रसिद्धीच्या झगमगाटापासून अलिप्तच असते. कळंबोली आणि नवीन पनवेल वसाहती जुन्या आणि श्रमिकांच्या पताका फडकावणाऱ्या आहेत. हातावरच्या रेषा कधी बोलतील याची वाट न पाहता स्वतःची वाट तयार करणारे, संघर्षमय जीवन जगणाऱ्या पोलादी मनगटाच्या माणसांची ही शहरे आहेत.
सर्व क्षेत्रांवर नियंत्रण ठेवणाऱ्या पनवेल शहराची सगळ्याच बाबतीत प्रतिकार शक्ती वाखाणण्याजोगी. त्यामुळे कदाचित कोरोनाशी छुपी युती करून अवघ्या 27 रुग्णांवर वाटाघाटी केलेल्या दिसतात. त्यातील खंदे 18 फलंदाज जोरदार फटकेबाजी करत घरी परतलेसुद्धा तर नऊ जणांची टीम लवकरच चषक घेऊन परतेल. हे शहर बहुतेक सिंह राशीचे असावे. सगळ्या क्षेत्रात त्यांची मक्तेदारी राहिली आहे. इथले नागरिक जागच्या पाठीवर कुठेच, कुणाला घाबरत नाहीत. त्यामुळे कोरोना घाबरला म्हणा किंवा वाटाघाटी, फिक्सिंग, हे अवगुणही शहराला चिकटल्याने कोरोनाची मशीन आधी सेट करून ठेवल्यासारखे इथले आकडे सेट केलेत की काय असा नेहमीचा संशय कुणालाही यावा असे एकंदर महापालिकेच्या कोरोना आकडेवारीवरून दिसते. पडद्यामागील घडामोडींचे शहर अशी आता पनवेलची ओळख होत चालली आहे. त्यामुळे संशयाचे धुके आणि ढग इथे कायम आहेत. पर्यायी प्रांजळ आणि प्रामाणिकता मागे पडत चालल्याने सोज्वळ, मेहनती आणि छक्के पंजे न करता जगणाऱ्यांना नाहक यातना देणारे शहर बनले आहे. इथे गप्प राहून मूठ बंद करून घेणाऱ्यांना खुप वाव आहे.
खांदा कॉलनी आणि तळोजा ही शहरे अलिप्तवादी आहेत. त्यांच्या बंडाचे निशाण मर्यादित असते. त्या तळोजात सहा जण कोरोनाबाधित आहेत. चौघांनी मात केली तर दोघांनी लढत देत माघार घेतली. खांदा कॉलनीत रुग्णांचा आकडा नवीन पनवेलमध्ये समाविष्ट केल्याने तिथे त्यांचे महापालिकेने स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे.
ही शहरे तशी शांत स्वभावाची आहेत. आदेशाचे पालन करणाऱ्या आज्ञार्थी लोकांची शहरे आहेत. अनुभव हाच गुरु मानणारा वर्ग दोन्हीकडे राहतो. कानाने ऐकणे, डोळ्यांनी पाहणे आणि हाताने काम करणे हिच त्यांची जगण्याची चौकट आहे.