सत्संग म्हणजे काय?

सत्संग म्हणजे काय?
...........................
- कांतीलाल कडू
............................
एकदा ब्रह्मश्री नारद भ्रमंती करत करत, नारायणाचा जप जपत आणि सुमधुर सुरात चिपळ्या वाजवत जगतनियंत्या विष्णूकडे गेले. त्यांनी शेषारूढ असलेल्या महाविष्णूला नमस्कार करून अतिशय नम्रपणे विचारले, महाराज सत्संग म्हणजे नेमकं काय?
विष्णू महाराज गालातल्या गालात हसले. म्हणाले नारदा, आज स्वारी एकदम सत्संग जाणायला आली आहे. व्वा, खरंच चांगला प्रश्न उपस्थित केलात. आपली जिज्ञासा पाहून आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या आहेत. सत्संग म्हणजे काय, हा प्रश्न विचारणारे पहिले विद्यार्थी आपणच आहात. खरं तर विद्यापीठानेच हा प्रश्न विचारावा, असे कुलपतींना थोड्या वेळासाठी नक्कीच वाटले असेल. ब्रह्मश्री नारद अगदी कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत होते.
इतक्यात, कूस बदलत नारायण म्हणाले... सत्संगाचा अर्थ तुला नुकताच जन्मलेला किडा सांगेल. एका ठिकाणी दलदलीत किडा जन्मला आहे. तो वळवळत आहे. तुला त्यांच्याकडून सत्संगाचा अर्थ नक्कीच ऐकायला मिळेल. ब्रह्मश्रींना आनंद झाला... काय ती वर्णावी गोडी म्हणत नारद महाराज पृथ्वीवर अवतरले. नारायण, नारायण असा जयघोष करत ते सांगितलेल्या दलदलीच्या ठिकाणी आले. सगळीकडे चिखल होता. महाराज त्या किड्याला शोधत असताना, वळवळत असताना त्यांच्या दृष्टीस पडला.
नारद महाराजांना केवढा तरी आनंद झाला. आता आपल्या प्रश्नाचे उत्तर सापडणार म्हणून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला....
त्यांनी अगदी दोन्ही कर जोडून, थोडे पुढे कमरेतून झुकुन त्या वळवळणाऱ्या किड्याला विचारले, मित्रा सत्संग म्हणजे काय रे?
ज्या क्षणी नारदांच्या ब्रह्ममुखातून शब्द उच्चारले गेले त्याच क्षणी त्या किड्याने प्राण सोडले. त्याची हालचाल कायमची थांबली होती.
नारद निराश झाले...!
हे काय आपल्याकडून पाप झाले म्हणून कोड्यात पडले. एका साध्या प्रश्नाचे उत्तर शोधायला आपण जगतमूर्तींच्या आदेशाने आलो तर पदरी हे पाप पडले. एका किड्याच्या हत्येला आपण कारणीभूत ठरलो. आता काय सांगायचे देवांना? असा प्रश्न त्यांना सतावू लागला. ते मनाने खजिल झाले...
आल्या पावलाने नाराज होऊन ते पुन्हा माघारी फिरले.... नारायण, नारायण असा मंत्रघोष करीत त्यांनी महाविष्णुचा दरबार गाठला. महाराज शेषारूढ झालेले आणि प्रसन्नचित्ताने नारदांकडे पाहत म्हणाले, वत्सा... काय सापडले का तुझ्या प्रश्नाचे उत्तर! सत्संग झाला का? असे लडिवाळपणे विचारत हसायला लागले.
नारद महाराज बिच्चारे, डोक्यावर पातक झाले म्हणून खुप घाबरलेल्या अवस्थेत बोलू लागले. म्हणाले महाराज अनर्थ घडला. कोणत्या जन्मीचे पाप केले माहीत नाही पण... आपण सांगितल्याप्रमाणे तो किडा शोधत त्यांच्याकडे गेलो... त्याला सत्संगाचा अर्थ विचारला तर त्याने त्याच क्षणी माझ्याकडे कटाक्ष टाकत देहत्याग केला...!
मला काही कळेना... सत्संग म्हणजे काय ते?
कृपा करून मला फोड करून सांगाल का, अशी ते लक्ष्मीनाथांना विनवणी करू लागले.
विश्वाचा चक्रधारीच तो... कुठे कशी आणि कधी कळ दाबायची ते त्याच्याशिवाय कुणाला ठावूक, नाही का? ते स्मित हास्य करत नारदांना म्हणाले... असे कसे झाले बरं! त्याने खरंच सत्संगाच अर्थ नाही सांगितला... देव जरा मुडमध्ये आले होते. नारदबुवा अजून थोडे बावचळले होते...
इतक्यात नारायण म्हणाले... आता एक काम करा. पृथ्वीतलावर जा, आताच्या आता... लगेचच. तिथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यात गाय व्ह्यायली आहे. तिला अतिशय गोजिरवाणा बछडा झाला आहे. तो आपल्याला नक्कीच सत्संगाचा अर्थ पटवून देईल...!
देवांची आज्ञा झाल्याने आता काहीही आढेवेढे न घेता मान डोलावत, जिव्हेवर नारायण, नारायण मंत्र जपत, चिपळ्यांतून मंगलमय सुरावट करत ते पुन्हा पृथ्वीतलावर आले. एका पापातून मुक्ती होण्यासाठी आता मंत्राचा जाप अधिक वेगाने ते करू लागले. मनात धाकधूक होती. पण नारायणाचा शब्द अंतिम असल्याने नारद महाराज मोठ्या उत्सुकतेने शेतकऱ्याच्या गोठ्यात आले. पाहतात तर गायीने एका गोंडस, छानशा बछड्याला नुकताच जन्म देवून मायेने चाटत होती.
ते नयनरम्य दृश्य पाहून नारदही भारावून गेले क्षणभर. ती ब्रह्ममाया पाहून नारद अधिक तल्लीन होत नारायणाचा जयघोष करू लागले. थोड्या वेळाने त्या बछड्याकडे पाहत अगदी नम्रपणे त्याच्यापुढे झुकले...
नम्रपणा हा सर्वात मोठा दागिना असल्याने जे जे सद्गुणी असतात ते नेहमी दुसऱ्यासमोर झुकत असतात फक्त आणि फक्त प्रेमाने.
आज कलियुगात लाचारी झुकायला प्रवृत्त करते. मुळात जे सत्वगुणी नसतात, त्यांना वारंवार झुकावेच लागते...! कुठंही पापाचे गाठोडे माथ्यावर घेत झुकणारे गल्लोगल्ली ढीगभर भेटतील...! तमोगुणीच ते... त्यांच्या रक्तातच लाचारी असल्याने त्यांच्या हातून नवनिर्मिती कशी होणार ? सृजनशीलतेशी त्यांचा काय बरं संबंध...? सत्संग त्यांच्या मेंदूत कसा उतरणार, नाही का? त्यालाही थोर भाग्य लागतं म्हणावं!
तर, नारद महाराज थोडे प्रेमाने पुढे झुकुन त्या गायीच्या बछड्याला काकुळतीला येत विचारतात... सत्संग म्हणजे काय ते सांगू शकशील का रे राजा...?
गायीचे बछडे अगदी टक लावून नारदांकडे पाहते आणि हसत हसत जीव सोडते...!
सत्संगाचे काही खरे नाही, म्हणत नारद महाराज आता पार कोलमडून जातात... आधी एका किड्याच्या हत्येचे पाप... आता तर गायीचे बछडे गेल्याने ब्रह्महत्याच झाली म्हणून नारद महाराज अतिशय खिन्न झाले. आता देवाला तोंड कसे दाखवाचे म्हणून फार चिंतेत पडले. जाऊ दे तो सत्संग... राहू दे अर्थ... नाही उमगला तरी चालेल पण हे हत्येचे पाप डोक्यावर नको म्हणत स्वारी नारायण, नारायणाचा जयघोष करत दरबारात दबक्या पावलांनी पोहचली...!
इकडे नटनाटकी, सूत्रधारी माऊली खुशीत होती. आपल्याला काहीच माहीत नाही अशा आविर्भावात महाविष्णु पहुडले होते, शेष महाराजांवर... डोक्यावर शेष महाराजांचे सहस्त्र मुखांचे फणे डोलत होते. शेष महाराजांची कांती सुवर्णासारखी चमकत होती. महाराज विष्णूदेव आणि त्यांचा महिमा तरी आपण काय वर्णावा... जिथे चारही वेद आणि अठरा पुराणे थकली... नेती नेती म्हणाले तिथे आपण तरी कोण?
नारद महाराजांच्या मुखातून शब्द फुटेना... ते शांतपणे विष्णुमाया अनुभवत होते...
काय झाले ब्रह्मश्री...? सत्संगाचा अर्थ कळला का?
त्यावर नारद महाराज म्हणाले, देवा त्यानेही प्राण सोडले. ब्रह्महत्या घडली हातून. आता तरी मला आपण कृपा करून सत्संगाचा अर्थ सांगून पाप मुक्त करा...!
यावर महविष्णु म्हणाले, असे कर... आता तु पृथ्वीतलावर जा लगेच... तिथे एका चक्रवर्तीला चौदा वर्षांनंतर मुलगा झाला आहे. तो तुला सत्संगाचा अर्थ सांगेल....
बाप रे... चौदा वर्षांनंतर चक्रवर्तीला मुलगा झाला आहे... त्याला काय झाले तर शिरच्छेद ठरलेला, असे नारद महाराज मनात ठरवून निघाले...
इकडे आले, पाहतात तर काय राजाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. राजवाडा सजला होता. बाहेर दारावर हत्ती झुलत होते. राजेशाही थाटात उत्सव सुरू होता. सोने, जवाहिरे राजा आनंदात वाटत होता. ढोल, ताशे, नगारे वाजत होते. तुतारीच्या नादाने आसमंत व्यापला होता...
नारद महाराज हळूहळू त्या पाळण्याजवळ गेले. श्वास रोखून, धीर करून त्यांनी त्या बालकाला विचारले.... सत्संग म्हणजे काय रे बाळा?
नारद महाराजांचे हे शब्द कानावर पडताच ते बालक जोरजोरात हसू लागले... म्हणाले महाराज मी किडा म्हणून जन्मलो होतो गत जन्मीच्या पापाने दलदलीत. आपले शब्द कानावर पडले आणि पुढचा जन्म पवित्र अशा गायीच्या पोटी झाला. तिथे आपली माझ्यावर दृष्टी पडली, शब्दस्पर्श झाला म्हणून आज मानव जन्म लाभला, तोसुध्दा एका चक्रवर्तीच्या पोटी, राजगृहात... हा आपल्या सत्संगाचा परिमाण आहे. हा योग, ही आपली पवित्र संगत आणि त्यामुळे झालेली ही उन्नती म्हणजेच सत्संग आहे महाराज... असे सांगून त्या बालकाने नारद महाराजांना साष्टांग घातला..
आता मात्र नारद महाराज देवांपुढे आत्मनिर्भरतेने गेले, म्हणाले आपल्या मायेने अखेर सत्संग घडवून आणला...!
नारायण नारायण...!
हे ऐकून महविष्णुही सत्संगात तल्लीन झाले.
गोष्ट तशी साधीच आहे. बोध आणि तत्व गहन, मोठे आहे. कुणाच्याही वळचणीला गुरांच्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांसारखे स्वतःला अडकवून घेण्यात जन्म व्यर्थ जातो. क्षणिक सुखासाठी माणूस कुठे अडकतो. पण सुसंगती घडण्याचे ध्येय असेल तर ब्रह्मश्री भेटतात...
कुमती निवारे सुमती के संग... संगत आणि पंगत खुप महत्वाची आहे. कुणासोबत मैत्री करायची आणि कुणाचे विचार अंगीकारायचे तसेच कुणाचे अन्न घ्यायचे, कुणाच्या फेकलेल्या तुकड्यावर जगायचे याला जीवनात खुप महत्व आहे.
यातूनच सत्संगाची परीक्षा घेतली जाते. तेव्हा हा नरजन्म वाया जाऊ द्यायचा नसेल तर सत्संग महत्वाचा आहे. तो घडवू या!


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...