कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी जिल्ह्यातील सरकारी डॉक्टरांना कोविड रुग्ण सेवेत प्रतिनियुक्ती द्या!

कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी जिल्ह्यातील सरकारी डॉक्टरांना कोविड रुग्ण सेवेत प्रतिनियुक्ती द्या!

.......................................................

पनवेल संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिला नवा पर्याय; अंमलबजावणीसाठी घातले साकडे

.......................................................

पनवेल: कोरोनाची वाढती दहशत मोडून काढताना कोविड -19 पनवेल उपजिल्हा रूग्णालय आणि एमजीएम रूग्णालय कामोठे येथील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांची दमछाक होत आहे. सतत दोन महिने कुटुंबापासून दुरू राहून सेवा देताना त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत त्यांना सुट्टी देणे अनिवार्य आहे. त्या काळात रुग्णांची देखभाल आणि उपचार करण्याकरिता जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य खाते आणि जिल्हा परिषदेच्या डॉक्टरांची कोविड हॉस्पिटलमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात यावी, अशा सक्षम पर्यायाचा प्रस्ताव पनवेल संघर्ष समितीने जिल्हा प्रशासन आणि पनवेल महापालिकेकडे पाठविला आहे.

कोविडने जनजीवन विस्कळीत केले आहे. दररोज उगवणारा सूर्य कोरोनाच्या दहशतीच्या नव्या घटना समोर आणत आहे. त्यात डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय यांची कोरोनाशी लढताना होणारी दमछाक पाहता त्यांनाही विश्रांतीची नितांत गरज आहे. शिवाय सलग दोन महिने ते आपल्या कुटुंबापासून दूर राहून हे युद्ध लढत असताना त्यांना सुट्टीवर न पाठविल्यास फार मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पनवेल महापालिका आयुक्त अँड. सुधाकर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांना पाठविलेल्या पत्रांतून व्यक्त केली आहे.

कालच राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी काढलेल्या अध्यादेशानुसार कोविड योद्धा डॉक्टरांना सात दिवस ड्युटी आणि सात दिवस सुट्टी असे नियोजन करण्याच्या सुचना जारी केल्या आहेत. परंतु, आपल्याकडे सरकारी डॉक्टर तेवढे कोविड युद्ध छेडत असताना त्यांच्या मदतीसाठी खासगी डॉक्टर पुढे येताना दिसत नाहीत. त्यामुळे त्या डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. 

यावर सोप्या पद्धतीने मार्ग काढण्यासाठी कांतीलाल कडू यांनी जिल्हा प्रशासनाला पर्याय सुचविला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गवई यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रात. किमान शंभर डॉक्टर आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितीत शंभरहून अधिक एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांना आता कोविड हॉस्पिटलमध्ये प्रतिनियुक्ती दिल्यास कोविड विरुद्धच्या लढाईला अधिक बळ येईल. त्यामुळे हा उत्तम पर्याय तातडीने अंमलात आणावा. तसेच त्याच धर्तीवर परिचारिका आणि वॉर्ड बॉयचा प्रश्नही मार्गी लावावा असे कडू यांनी सुचविले आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिका क्षेत्र, पनवेल तालुका आणि उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी हे पाऊल आजच उचलणे गरजेचे असल्याने तातडीने निर्णय घ्यावा, असे सुचित करण्यात आले आहे.

या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता आणि सार्वजनिक आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना पाठविल्या आहेत.

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...