डॉक्टर, 'माणूस' आहात, हे सिद्ध करण्याची हिच ती वेळ!

डॉक्टर, 'माणूस' आहात, हे सिद्ध करण्याची हिच ती वेळ!

कोरोनाचे रुग्ण गुणाकार पद्धतीने वाढत आहेत. नक्कीच चिंताजनक परिस्थिती आहे. रोजचे वाढते आकडे आणि रुग्णांची स्थिती पाहून काळीज तिळतिळ तुटत आहे. खाटा मुबलक आहेत. कोरोनावरची जुजबी औषधं येवून पडली आहेत. परंतु, रुग्णाच्या पाठीवर मायेचा हात फिरवणाऱ्या डॉक्टरांची कमतरता आहे. डॉक्टर नाहीतच, ही परिस्थिती कुणाच्या लक्षातही येत नाही. त्यामुळे आता रुग्णांची भर्ती नाही तर दहा-पंधरा दिवसांसाठी कैद्यांना डांबून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा आपणच आपल्या देशात देत आहोत, हा नवा इतिहास घडवत आहोत. 

सगळे उपाय थकले आहेत. कोरोनावर अद्याप रामबाण उपाय नाहीच. पण दररोज नव्या समस्या घेवून कोरोना अग्निपरीक्षा द्यायला भाग पाडत आहे. आधीच महापालिकेचे मनुष्यबळ मोठी डोकेदुखी ठरविणारी असताना आणि त्यांचा वैद्यकीय क्षेत्राशी दूरन्वयानेही संबंध नसतात सीमावर्ती भागातील सैनिकांसारखे 'कपाळाला कफन' बांधून कोरोनाविरुद्ध युद्ध लढत आहेत. 

उपजिल्हा रुग्णालयातील मोजक्या अठरा डॉक्टरांची फलटण कोरोनावर तुटून पडली आहे. एमजीएम हॉस्पिटलमध्ये अर्ध्याहून अधिक डॉक्टर, परिचारिका बाधित होवूनही तिथे कोरोनाला नामोहरम करण्यासाठी उर्वरित डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. इंडिया बुल्समध्ये हातच्या बोटावर मोजण्या इतक्या डॉक्टरांचा संच कोरोनाचा ऑर्केस्ट्रा अंगावर झेलत आहेत. तिथे दहा-बारा डॉक्टर आणि शेकडो रुग्ण, त्यांच्यासोबत पाच-सातशे संशयित वऱ्हाडी कुटुंबदार... अशी भयावह परिस्थिती आहे. 

महापालिका त्यांच्या संकेतस्थळावर झोळी पसरून थकली. त्यांच्या आवाहनानंतर अवघे दहा पंधरा डॉक्टर पुढे आले. ते राबत आहेत. त्यातील काहींना जबरदस्तीने जुंपले आहेत. तेसुध्दा बाजी प्रभूसारखे मागे न हटता खिंड लढवत आहेत. तर काही नव्हे तर किमान पनवेल तालुका आणि शहरातील सात-आठशे डॉक्टर हा बिनपैशाचा लांबून तमाशा बघत आहेत. त्यांनी सगळी लाज खुंटीला बांधून ठेवली आहे. एक-दोन डॉक्टर जीवाची पर्वा न करता महापालिकेला मदत करीत आहेत. इतर डॉक्टर वर्षभर लुटमारीचा व्यवसाय करून मे महिन्यात वर्षा सहलीला जातात, देश परदेशातही. तसे ऐशारामात घरात दडून बसले आहेत. सात पिढ्यांची संपत्ती गोळा केल्याने त्यांना काहीही फरक पडत नाही. अर्थात ही परिस्थिती सर्व डॉक्टरांची नाही. परंतु, ज्यांच्या जीवनाला सामाजिक पदर नाही ते गर्भश्रीमंत बनले आहेत. प्रत्येक माणसाने श्रीमंत बनले पाहिजे मनाने आणि लौकिकार्थानेही.... मात्र, लुबाडून, फसवणूक करून आणि परिस्थितीचा गैरफायदा उठवून प्राप्त केलेली श्रीमंती कस्पटासमान असते.

डॉक्टर, तुम्ही आता विचार करा. कोविड सेवेतील सैनक आहात याचा विसर कसा पडू देता? सीमेवर कोणत्याही क्षणी वीरमरण येते, हे ठावूक असताना आपले सैन्य एक इंचही मागे हटत नाही. तुम्ही ते सैन्य आहात. भारतमातेची सीमा, इंच इंच जागा कोरोनाने व्यापली आहे. इथे तुम्हालाच हे तिसरे महायुध्द लढले पाहिजे. युद्धात कुणाचा पुत्र जातो, कुणाचे बाबा असतात, कुणाचा भाऊ असतो तर कुणाच्या कुंकवाचा धनी असतो. ते देशसेवेसाठी कसलाही विचार करत नाहीत. कोरोना महामारीसुद्धा युद्धच आहे, किंबहुना जगातील सर्वांत मोठे, 'न भूतो न भविष्यती' असे युद्ध आहे. 

डॉक्टर, आपल्याकडे ती शस्त्रे आहेत. ती जगावेगळी बुद्धी आहे. आज तुम्ही पुढे आलात आणि हा चक्रव्यूह भेदायची भीष्मप्रतिज्ञा घेतलीत तर नक्कीच आपण कोरोना मुक्त होऊ शकू. मृत्यू कधीही कुणालाही येऊ शकतो. विश्वातील एकमेव चारित्र्यवान मित्र कोण असेल तर तो मृत्यू आहे. क्षणात सर्व बंधनाचा मोहपाश तोडून विरक्ती देतो तो सच्चा मृत्यू नावाचा मित्र आहे. 

डॉक्टर, तुम्हाला हिच भीती वाटते, स्वाभाविक आहे. आपण शवापलीकडील के'शव' नाही आहोत. सर्वसामान्य माणसं आहोत. त्यात तुम्ही वैद्यकीय पदवी घेतल्याने असामान्य आहात. शूर, वीर, योद्धा आहात. या युद्धातील सर्वश्रेष्ठ सैनिक आहात. तुम्हीच कोरोनाचा रावण मारू शकता.

सरकारचे हात तोकडे पडले आहेत. महापालिका सरकारच्या आदेशाचे पालन करीत आहे. केंद्र शासन, राज्य शासन दोन्ही सरकारने कोरोनापुढे गुडघे टेकले आहेत, सुदैवाने अद्याप पाठ टेकलेली नाही. ते पाठ टेकतील त्या दिवशी सोसायटीच्या आवारात, गावातील घरांच्या अंगणात स्मशाने पेटतील. ती पेटवायला तरी माणसं शिल्लक राहतील की नाही, याबाबत मनात साशंकता आहेच. म्हणून डॉक्टर तुम्ही माणूस आहात हे सिद्ध करण्यासाठी अंतरंगातील पांडुरंग जागवून कटेवरचे हात मोकळे सोडून रणांगणात उतरायला हवेच. महापालिका, सरकार पन्नास लाखांचा विमा कवच देईल का? मानधन किती देईल? या बाबी दुय्यम आहेत. त्या महत्वाच्या आहेतच. मरण यायचे असेल तर कोरोना कारणीभूत होईल असे ही नाही. डॉ. नीतू मांडकेसारख्या महायोद्ध्याला वाचविणारी यंत्रणा आपल्याकडे तेव्हाही नव्हती आणि आजही नाही. मृत्यू, कुटुंबाचा विचार करून हा नरदेह विटाळणे ही माणुसकी ठरू शकत नाही.

डॉक्टर, समाज आहे म्हणून आपण आहात. आपली वैद्यकीय ताकद समाजापेक्षा मोठी आहे, हे सिद्ध करण्याची ही वेळ आहे. मृगाच्या बेंबीत कस्तुरी असते. तरीही ते अज्ञानाने सुगंधाचा शोध घेत रानीवनी हिंडत असते. तुमच्या हाती तर संजीवनी आहे, धन्वंतरी आहे. ते हात जगन्नाथाचे होऊ द्या. आपण कस्तुरीपेक्षा जास्त सुगंधित आहातच. कोरोनाबाधित रुग्णांचे आयुष्य सुगंधित करायला आताच घराबाहेर पडून महापालिकेला सहकार्य करा... मरावे परि कीर्तीरुप उरावे, ही उक्ती आणि वृत्ती अंगिकारली तर मृत्यू नावाचा मित्र बहुउपकारी ठरेल आणि चित्रगुप्ताला सांगून दीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्य तुमच्यासह कुटुंबालाही प्रदान करेल. आता 'दवा आणि दुवा ' हेच कामी येते, बाकी काही नाही.

डॉक्टर, आज तुमची समाजाला गरज आहे. हा समाज खरं तर कुणाचाच नसतो. पण, आपल्या काळजातील आपुलकी, माणुसकी, सामाजिक भान त्यांचे ऋणी आहे, इतकंच कोमल नाते जपून युद्धात उतरा... डॉक्टर!

शेवटी जोरजबरदस्तीने तुम्हाला महापालिका प्रशासनाने ओढले तर आपल्यातील डॉक्टर तिथे काया, वाचे, मने काम करणार नाही. जिथे प्रेम, शुद्ध प्रेम नसते तिथे फक्त एक सोपास्कार असतो, ज्यातून काहीही सिद्ध होत नाही. 

उद्या, कदाचित महापालिका प्रशासन तुमची डिग्री, हॉस्पिटल नोंदणी रद्द करण्याचा, नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेऊ शकते. तो निर्णय त्यांनी घेतलाच तर तुमच्यातील संवेदनशील डॉक्टरची सृजनशीलता कोविड मृत्यूसारखीच प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेली असेल...!

माफ करा, डॉक्टर... आपल्याला जागे करण्याचा एक सामाजिक प्रयत्न आहे. हृदय पिळवटून रक्ताच्या शाहीने लिहीत आहे. आपल्या महाराष्ट्रातील बाबा आमटे नावाच्या एका सर्वसामान्य माणसाने कुष्ठ रुग्णांना विश्वास देण्यासाठी कुष्ठरोगाचे जंतू असलेली लस स्वतःला टोचून घेतली होती. त्यांच्या कार्याची कीर्ती आभाळ भेदून पसरली आहे. त्यांचा वारसा कोरोना काळात आपल्याला चालवायला पाहिजे.

प्रशासन, राज्य, केंद्र सरकार कमी पडत असेल. मात्र, तुम्ही आई आहात समाजाची... एक आई कधीच मरत नाही... तुम्ही ते मातृत्व सिद्ध करा, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आहे...!

डॉक्टर, हे वाचून आपले पित्त खवळले असेल कदाचित...! बोलणाऱ्याचे तोंड आणि मारणाऱ्याची काठी धरणे अवघड आहे, तसा लिहिणाऱ्याला आवरणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. त्या बदल्यात अगदी इरसाल शिव्या हासडा, कोरोना मुक्त महापालिका, ग्रामीण भाग करून हवे तर आम्हाला हत्तीच्या पायदळी तुडवा... तक्रार करणार नाही, शर्थ इतुकीच आहे... ही मानवता जपून घर घर, सोसायटी, गाव, मोहल्ला, शहरांमध्ये कोरोना मुक्तीच्या स्वातंत्र्याची गुढी उभारू द्या, तेवढ्यासाठी डॉक्टर तुम्ही माणूस आहात, हे सिद्ध करा....

तुमच्या हाताचे लाखो 

जीव चुंबन घेतील प्रेमाने....

पवित्र चरणांवर डोकं ठेवून

ऋण व्यक्त करतील आपुलकीने...

सैनिक बनून कोरोनाला ठेचू या

जगातील सर्वात मोठ्या मानवतेने...

डॉक्टर.... डॉक्टर...!

तुमि विद्या, तुमि धर्म

तुमि हृदि, तुमि मर्म

त्वम् हि प्राणा: शरीरे

बाहुते तुमि मा शक्ति,

हृदये तुमि मा भक्ति,

तोमारई प्रतिमा गडी मन्दिरे-मन्दिरे॥

आज, मानवतेचे पुजारी, बंकींम चंद्र चटोपाध्याय यांचा जन्मदिवस आहे. 'वंदे मातरम' या राष्ट्रगीतातील वरील ओळींची आठवण करून त्यातून तुमच्यात दडलेल्या सैनिकाच्या आत्म्याला ही समर्पित केलेली ओवी आहे... तेव्हा उठा, सज्ज व्हा, उठा चला... कोरोनाच्या विषाणूचे आक्रमण चिरडून काढण्यासाठी पुढे या. महापालिकेला सहकार्य करा, तुमच्या हॉस्पिटलचे आणि हृदयाचे दरवाजे उघडा...हिच आर्त हाक कानोसा देवून ऐकाल, याची शाश्वती आहेच...!

डॉक्टर इतके तरी करा ना!

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...