वासरू हंबरायचं तेव्हा  माणसाला पान्हा फुटायचा!







वासरू हंबरायचं तेव्हा 

माणसाला पान्हा फुटायचा!

.....................................

- कांतीलाल कडू

...............................

नमस्कार कृष्णदेवा...

नमस्कार, नमस्कार... बोल पेंद्या, कसा आहेस तू... आणि राज्यात कसं सगळं सुरळीत चाललंय ना... चाललंच पाहिजे कारण आपलं तर ठरलंय, 'आनंदाच्या डोही, आनंद तरंगे...'

बोल पेंद्या, कसं येणं झाले.?

देवा, देवा... सगळीकडे इतकी महामारी पसरली आहे आणि तुम्ही आनंद तरंगे म्हणता?... अहो, स्वप्नातही तरंगणारे खाडकन जमिनीवर आदळलेत. काहींना तर देवा... महापालिकेचे चार कर्मचारी अलगद उचलून स्मशानात घेऊन जाताना दिसतात... सगळीकडे भीती दाटलीय देवा... मना मनात भीतीचे धुमारे फुटलेत देवा.

अरे पेंद्या, असे काही नाही रे... माणूस हा जन्मतःच भित्रा प्राणी आहे. तो वाघ असल्यासारखे दाखवत असला तरी तो सशासारखा भित्रा आहे....

देवा, तुम्हाला बोलायला काय जातंय!

तुमच्याकडं सोळा हजार सहस्त्र मैत्रिणी आहेत. म्हणजे, तेवढ्या जणींच्या साड्यांचे पदर तुमच्या हाती आहे... म्हणजे तुमचा 'मास्क पॉवरफुल' आहे, इम्युनिटी मजबूत आहे देवा...

इथे घराबाहेर पडलं की, पोलिस हाणतात आणि पालिकेवाले शंभरची पावती फाडतात...!

लोकांची तीसची चपटी प्यायचे वांदे झालेत देवा...!

अरे पेंद्या, माणूस फार उतमात करीत आहे. त्याला आकाश ठेंगणे वाटत होतं. प्रचंड विषमता निर्माण झाली आहे. उच्चनिचतेच्या फुटपट्टया लावल्या जात आहेत. गरीब, श्रीमंतांमध्ये दरी निर्माण झाली आहे. सत्तेच्या चाव्या आपल्याच हाती मरेपर्यंत राहिल्या पाहिजे, असा हट्टहास करीत आहे. जातीजातीत भांडणं लावली जात आहेत. आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरत आहे. शिक्षण म्हणजे ज्ञान आहे. जे ज्ञानी झालेत त्यांना इतर तुच्छ वाटू लागलेत. प्रत्येकाच्या दृष्टीत कमालीचे दोष निर्माण झाले आहेत. हृदयातील प्रेमाची भाषा नष्ट होऊन द्वेष, मत्सर, असूया वाढीस लागली. 

समाज बुजगावणे होत चाललंय... हे सगळं पाहून 'एकोस्मी बहुस्याम... ची माझी संकल्पना चुकीची होती, अशी मलाच खंत वाटू लागली रे मित्रा....

तरुण पिढी करियरच्या नावाने संस्कार, संस्कृती, नीती, परोपकार आणि कर्तव्य विसरून आई-बाबांना दूर ढकलून एकांताची शिक्षा देत आहेत. कुटुंब हे गोकुळ अशी माझीच विश्वनिर्मितीची रचना होती. ती नव्या पिढीने 'झिरो फिगर'सारखी खिळखिळी करून ठेवली आहे.

पेंद्या, जी द्वारका निर्माण केली होती, ती बुडवावी लागली, माझ्याच हाताने. मलाही कष्ट झाले, यातना झाल्या, कायमची सल राहिली हृदयाला बोचत. द्वारकावासिय कधीच सुधारले नाहीत शेवटपर्यंत.... उतले होते, मातले होते, स्वतःच्याच मस्तीत दंगले होते, रमले होते. विश्वनियंत्याला काळजावर दगड ठेवून द्वारका बुडवावी लागली, गोकुळ शिस्तीत, संस्कारांच्या वेलीसारखे बहरत होते, त्यालाही आता अहंकाराची दृष्ट लागली आहे.

मीच सर्वश्रेष्ठ असल्याची खुमखुमी नसानसात आणि मनमनात उत्पन्न झाल्याने देवलोक तक्रार करू लागले आहेत. संत सज्जनाला त्रास देवून दुर्जनांचा जयजयकार होऊ लागला आहे, सगळीकडे. त्यांच्या फ्रेंचाईच्या शाखा सर्वत्र निघत आहेत. जगाचे मालक असल्यासारखे वागत आहेत. साध्या सोसायटीचा चेअरमन स्वतःला आमदार आणि आमदार स्वतःला मुख्यमंत्री समजू लागला आहे. कुणी कुणाचे अश्रू पुसायला पुढे येत नाहीत. आले तर लगेच फोटोसेशन, सेल्फी आणि मग भाटांची फौज पुढचे सोपस्कार पूर्ण करतात. माणसाला स्वावलंबी बनवण्याचा 'योगा' कुणीही शिकवत नाहीत. सगळीकडे लाचारीच्या तालमी आणि आखाडे तयार केले आहेत. त्यातून माणसाच्या बोन्सायांतून सैतान तयार होऊ लागले आहेत...

कृष्ण देवाला मध्येच थांबावत... पेंद्या जरा लडिवाळपणे हट्ट सांगतो....

देवा मला गीता सांगू नका हो, जमाना रोमँटिकचा आहे. तुम्ही इतकं बाळबोध पाजलेत तर आता नाही चालणार...!

पेंद्या, अरे हेच सांगतो मी. मुळ संस्कार आणि संस्कृती, विवेक, स्वावलंबन जसे माणसाने दूर फेकून दिले ना, त्याचक्षणी जीवनशैली बदलली. तेव्हाच माणूस स्वतच्या विनाशाकडे पावलं टाकू लागला.

सृष्टीचा ऱ्हास कुणी केला. लाखो झाडांची कत्तल करणारे हात पवित्र कसे असतील. डोंगर, दऱ्या, मोठे पर्वत, त्यावरील संजीवनीची रोपं, कुठे गेली, कशी लुप्त झाली... अनाचार माजल्यावर पृथ्वीवर अनेकदा उत्पात घडून आलेला आहे. त्याची ही रंगीत तालीम आहे. कोरोना हा एक ट्रेलर आहे, पेंद्या...

तुझ्याच भाषेत सांगायचं झाले तर कोरोना आता दवंडी पिटवून सांगतो आहे... आता जर नव्या युगाच्या हाका ऐकत अहंकार, माज आयुष्यातून वजा केले नाहीत तर कोरोनासारख्या विषाणूची बेरीज होत राहील, मृतांच्या आकड्यांचा गुणाकार, नात्यानात्यांचा भागाकार आणि दुर्जनांची वजाबाकी होईल. उरतील ते फक्त सज्जन... 

पेंद्या, विसरू नकोस... माझे ब्रीद आहे. सज्जनांच्या रक्षणासाठीच अवतार धारण करेन पण तत्पूर्वी मोठा उत्पात घडवून सृष्टीचे नियमन करावे लागेल...!

देवा, हा तुझा 'बुस्टर झाला. जरा हलका उपाय केलात तर नाही का चालणार? म्हणजे कसे... आपण सगळे एकत्र खेळायचो, बागडायचो... एकमेकांचे दुःख प्यायचो आणि सुख, एक तिळ सात जणांमध्ये वाटप करावे तसे समानतेने वाटून घ्यायचो. वासरू हंबरडा फोडायचा तेव्हा माणसालाही पान्हा फुटायचा... असे नाही का होणार परत...!

आता काय झाले देवा, कोरोना उच्चारताना समोर मृत्यू दिसतो. ही भीती तरी दूर कर देवा...

पेंद्या अरे, ही भीती असती तर लोकं जत्रेसारखी घराबाहेर पडली असती का...?

देवा, पोटा पाण्याचा प्रश्न आहे रे! माणूस स्वार्थी असला तरी तो कुटुंबाला जपण्याचाच प्रयत्न करतो रे. समजून घे त्याला.

पेंद्या... माणूस पोटा पाण्याचा विचार कमी आणि जहागिरदारी जास्त करतो रे. ज्याला पोटाची खळगी भरायची आहे, त्याचा आवाज कधी कधी कंठातून बाहेरही पडत नाही. त्याची आदळआपट नसते... आणि अशा माणसाच्या गरजा तरी किती आहेत रे...

मनाच्या आणि क्षमतेच्या परिघाबाहेर जावून अपेक्षा करतो माणूस. त्या पूर्ण झाल्या नाहीत की वाट्याला येते त्याला दुःख म्हणतात. दुःखाचं झाड प्रत्येक माणूस स्वतःच्या हाताने अंगणात लावतो. वाढवतो, निगरानी करतो आणि त्याच्या बुंध्यापाशीच जीव सोडतो, एके दिवशी! सगळं सुख म्हणून जे कवटाळून घेतो आयुष्याला ते प्रत्यक्षात दुःख असते... त्या दुखःला अंत असतो...!

देवा, देवा असे एकदम कोपून बोलू नका. तुझ्याशिवाय कुणीही त्राता नाही रे... काही तरी करून ही द्वारका पुन्हा विसर्जित होण्यापासून वाचवायलाच हवी.

कोणतीही घटना कारणांशिवाय कधीच घडत नाही, घडली नाही, पेंद्या!

जे जे घडतं ते चांगल्यासाठी आणि पुढे घडणार आहे ते ही चांगलंच असेल... जेव्हा गीता सांगायची गरज असेल तेव्हा मी येईनच. युद्ध छेडायचे असेल तेव्हाही मी जरूर सारथी होईन. जेव्हा अंगणात खोड्या करायच्या असतील, खेळायचं असेल तेव्हाही मी असेनच... मी नाही असे कधीच होणार नाही... दृष्टीला पडत नाही ते नाहीच, हा सुद्धा अहंकार आहे, तो नष्ट झाल्याशिवाय मनाला नवनिर्मितीची पालवी फुटणार नाही... ती फुटेल तेव्हा तो अंकुर जपण्याची व्यवस्था करायला नक्कीच असेन. आता सरकारच्या आदेशाचे पालन जरी काटेकोरपणे केले तरी महाआणीबाणीतून वाचाल... ! जसे मला जन्मतःच वासुदेवांनी यमुनेच्या पैलतीरावर सुखरूप एका टोपलीतून नेले तसे तुम्हाला सुखरूप पैलतीरावर नेण्याची माझी ग्वाही नक्की पूर्ण करेन... पण तेवढ्यासाठी तरी द्वारका नव्हे गोकुळवासिय व्हा!

पेंद्या, आपण भेटत राहू... सुरक्षित अंतर ठेवून. भेटणं, बोलणे यालाच तर 'आनंदाच्या डोहीं आनंद तरंगे'ची अनुभूती घेणं म्हणतात. ती अनुभवणारा सर्व आधी, व्याधी, विकारांवर मात करून स्वानंद सुख इथेच अनुभवेल!

जय जय राम कृष्ण हरीचा लाभ घ्या...

राम म्हणजे रामायण आहे, कृष्ण म्हणजे महाभारत आहे आणि हरी अर्थातच भागवत आहे... या पलिकडे काहीच नाही पेंद्या!

देवा, ही नवी गीता सांगितलीस. धन्य झालो देवा. आता खरा आत्मनिर्भर झालो..., आता जन्म मरणाच्या गर्तेत न अडकता सत्कर्माला वाहून घेतो, देवा!

... आणि हो, तूर्तास तरी सरकारी म्हणजे राजाचे नियम पाळतो... बाकी तुम्ही बघून घ्या, देवा !




















ReplyForward







Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...