महिलेच्या हत्येप्रकरणी भंगार विक्रेत्याला बेड्या
गुन्हे शाखेच्या पनवेल युनिट-२ ची यशस्वी कामगिरी
तळोजा/प्रतिनिधी
नागझरी गावालगत असलेल्या खदानीमध्ये गावातील ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला शकुंतला ठाकुर या रविवारी (ता. १५) कपडे धुण्यासाठी गेल्या असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्घुण हत्या केली होती. त्यानंतर आरोपीने शकुंतला ठाकूर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व कानातील झुमक्यांची जबरी चोरी केली होती. याबाबत तळोजा पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा संवेदनशील गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिस आयुक्त नवी मुंबई, अपर पोलिस आयुक्त गुन्हे डॉ. शेखर पाटील, पोलिस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मागर्दशनाखाली गुन्हे शाखा युनिट २ पनवेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे त्यांनी समांतर तपास सुरू केला.
गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने अतिशय गोपनीयरित्या, कौशल्यपूर्ण तपास करून ४८ तासात आरोपी विजयकुमार मुनेश्वर मंडल (वय ३०, मूळ रा. नेपाळ) यास गुन्हे शाखा युनिट-२ पनवेल यांनी अटक केली आहे. आरोपी हा दहा वर्षापासून तळोजा परिसरामध्ये भंगार गोळा करून विक्री करण्याचा व्यवसाय करतो. मागील पंधरा दिवसापूर्वी मयत शकुंतला ठाकूर या खदानामध्ये कपडे धूत असताना, आरोपी इसम हा तेथे आंघोळ करीत होता. त्यावेळी मयत महिला व आरोपी यांच्यामध्ये वाद झालेला होता. त्यावेळी मयत महिलेने आरोपीला शिवीगाळ करून दगड मारलेला होता. त्याचा राग मनात धरून आरोपीने मयत महिलेवर पाळत ठेवून तिला एकटे पाहून तिच्या अंगावरील दागिने जबरीने चोरून तिच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आहे.
गुन्हे शाखा युनिट २ ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कराड, प्रवीण फडतरे, संदीप गायकवाड, शरद ढोले, पोलिस हवालदार साळुंखे, रणजित पाटील, भोपी, पाटील यांनी ४८ तासात गुन्हा उघडकीस आणला आहे.
या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त नवी मुंबई यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे आधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक केले आहे.