धक्कादायक! खैरपाडा गावात दहा दिवसात पाच जणांचा मृत्यू
* आरोग्य यंत्रणा संभ्रमात * ग्रामस्थ भीतीच्या छायेत * कावीळची शक्यता
कर्जत/संतोष पेरणे
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतमधील खैरपाडा गावात मागील १० दिवसात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अचानक मृत्यू पावत असलेल्या व्यक्तींना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संभ्रमात सापडली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने संपूर्ण गावातील व्यक्तींची तपासणी केली असून होणार्या मृत्यूबाबत कोणतीही माहिती पुढे येत नसल्याने वारे ग्रामपंचायत परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर वारे ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीमधील खैरपाडा गावात मागील दहा दिवसांपासून भीतीचे वातावरण पसरले आहे. जेमतेम ४० घरांची वस्ती असलेल्या खैरपाडा गावात ९ नोव्हेंबर रोजी एक ४२ वर्षीय व्यक्ती किरकोळ आजाराने मृत्युमुखी पडली. त्यानंतर आतपर्यंत तब्बल पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यातील तीन रुग्ण हे अनुक्रमे एमजीएम रुग्णालय कळंबोली, साई हॉस्पिटल नेरळ आणि उल्हासनगर येथील रुग्णालयात दाखल केले होते. तर दोन व्यक्तींचे मृत्यू हे हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्युमुखी पडले आहेत. मात्र सर्व मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत हे विशेष साम्य आहे.
आजच्या दिवशी देखील एक ४२ वर्षीय आदिवासी पुरुष मृत्युमुखी पडला असून त्या सर्व व्यक्तींच्या मृत्यूनंतर कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने गावात जाऊन पाहणी केली असता, गावातील कोणत्याही व्यक्तीला कोरोना झाला नाही आणि कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे देखील नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील चक्रावली असून खैरपाडा गावातील पाच व्यक्तींचे झालेले मृत्यूंचे सरासरी वयोमान साधारण ४२-४५ वर्षे एवढे आहे.
अचानक झालेले मृत्यू लक्षात घेता कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश यादव यांनी सर्व रहिवाशांची आरोग्य तपासणी केली. त्यात कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यामुळे आरोग्य विभाग देखील संभ्रमात सापडला आहे. मात्र गावातील पाच व्यक्तींचे झालेले मृत्यू हे कावीळ झाल्याने झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य यंत्रणेला आहे. त्या दृष्टीने गावातील ४० घरांमध्ये असलेल्या २८ खासगी बोअरवेल यांच्यातील पाण्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कावीळ ही प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे होऊ शकते आणि पांढरी कावीळ झाल्यास मृत्यू लगेच ओढवतात ही शक्यता लक्षात घेऊन कर्जत पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. मात्र गावातील सर्व घरातील लोक हे पाणी उकळवून पित आहेत आणि तरीदेखील मृत्यूच्या घटना थांबत नाहीत. यामुळे आरोग्य विभागाने पाण्याच्या नमुन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
------------------------------------------------------------------------------
रक्ताची उलटी आणि त्यानंतर झालेले मृत्यू हे कोरोनामुळे झाले नाहीत हे सिद्ध झाले आहे. मात्र मृत्यू का होतात? याचा अभ्यास आम्ही सुरू केला असून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन अहवाल लक्षात घेता कावीळची शक्यता अधिक आहे. त्यामुळे दूषित पाण्याने कावीळ होऊ शकते हे लक्षात घेऊन आम्ही गावातील सर्व २८ बोअरवेलमधील पाणी तपासणीसाठी पाठवले आहे.
-डॉ निलेश यादव, वैद्यकीय अधिकारी,
कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र
आम्ही वारे ग्रामपंचायतीमधील घटनेकडे तात्काळ लक्ष केंद्रित केले असून गावातील खासगी बोअरवेलमधून तर दूषित पाणी येत नाही ना? याचा अभ्यास करण्यासाठी आणि तात्काळ उपाययोजना करण्यासाठी आम्ही पाण्याचे नमुने घेतले आहेत. त्यांचे अहवाल आल्यावर तात्काळ तालुक्यातील आरोग्य यंत्रणा वारे ग्रामपंचायतीमधील मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न करील.
-बाळाजी पुरी, गटविकास अधिकारी,
कर्जत पंचायत समिती