पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर नोटीस
सातारा/प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडे संपत्तीचे मागील दहा वर्षांतील विवरण मागण्यात आले आहे. २१ दिवसांत या नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे.
पृथ्वीराज यांना ऐन दिवाळीतच आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत त्यांनी आज माध्यमांना माहिती दिली. या नोटिशीला २१ दिवसांत उत्तर द्यायचं असून प्रत्यक्ष हजर राहण्यासही सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने आम्ही योग्य ती कार्यवाही करत आहोत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. ही नोटीस म्हणजे आयकर विभागाच्या नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे नमूद करतानाच चव्हाण यांनी यावेळी केंद्रातील भाजप सरकारलाही लक्ष्य केले.
शरद पवार यांना बजावण्यात आलेल्या नोटीसवर बोट ठेवत चव्हाण यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आपले परखड मत व्यक्त केले. सत्तेचा वापर कसा करायचा?, तो कोणासाठी करायचा?, याबाबत भाजपने नियोजनबद्धपणे व्यूहरचना केली आहे. त्यानुसार सगळं काही सुरू असतं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अशीच नोटीस आली होती आणि आता मला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावर योग्यते स्पष्टीकरण मी देणारच आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकार व भाजपवर सातत्याने चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे.