साडे अकरा लाखांच्या बनावट नोटांसह चौघांना पोलिसांनी केली अटक
नवी मुंबई, मुंब्रा, ठाणे आणि मुंबई परिसरात बनावट नोटा वटविण्यासाठी आणल्याची कबुली
ठाणे/प्रतिनिधी
भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयीत आरोपी येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ठाणे शहर खंडणी विरोधी पथकाने मुंब्र्यात सापळा रचून चार आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून २००, ५०० आणि २००० रुपयांच्या ११ लाख ४९ हजार रुपयांच्या नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्याकडून ७ विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि स्कॅनर मशीनही हस्तगत करण्यात आल्या आहेत.
खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींकडे २००, ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट चलनी नोटा सापडल्या आहेत. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. ११ लाख ४९ हजारांच्या या नोटांमध्ये २०० रुपयांच्या १५ नोटा, ५०० रुपयांच्या ९४८ नोटा, २००० रुपयांच्या ३३६ नोटा अशा एकूण ११ लाख ४९ हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
अटक आरोपींच्या चौकशीत या बनावट नोटा आरोपी प्रवीण देवाजी परमार आणि आरोपी मुजफ्फर पावसकर यांच्या स्कॅनर प्रिंटरच्या सहाय्याने जेके बॉण्ड पेपरचा वापर करून छपाई करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या बनावट नोटा मुंब्रा, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात वटविण्यासाठी आणल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
खंडणी विरोधी पथकाने अटक आरोपींमध्ये मुजम्मील मोहोम्मद साल्हे सुर्वे (४०), मुजफ्फर शौकत पावसकर (४१), प्रवीण देवजी परमार (४३) नसरीन इम्तियाज काझी (४१) यांचा समावेश आहे.