शपथ ग्रहणनंतर ७२ तासात बिहारमध्ये शिक्षणमंत्र्याचा राजीनामा
नितीश कुमार सरकारला झटका
पाटणा/वृत्तसंस्था
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं सरकार स्थापन झालं असलं तरी या सरकारमागचे शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. नव्या सरकारमधील शिक्षण मंत्री डॉ. मेवालाल चौधरी यांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मेवालाल यांना अवघ्या ७२ तासांच्या आतच मंत्रिपदाला रामराम करावा लागला आहे.
डॉ. मेवालाल चौधरी यांनी मंगळवारी नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर लालूप्रसाद यादव यांच्यासह संपूर्ण राजद पक्षाने मेवालाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एनडीए सरकारमध्ये भरती घोटाळ्यातील आरोपीला थेट कॅबिनेट मंत्री बनवलं गेलं, यावर बोट ठेवून लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती.
तेजस्वी जेव्हा आपल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये बिहारमधील युवांना १० लाख नोकर्या देण्यासाठी वचनबद्ध होता. तर दुसरीकडे भरती घोटाळा करणार्या मेवालाल यांना मंत्री बनवण्याची नितीश कुमार यांची प्राथमिकता होती, असं ट्विट लालूप्रसाद यादव यांनी केलं होतं.
मेवालाल यांनी घेतली होती नितीश कुमारांची भेट
विरोधकांच्या जोरदार टीकेनंतर भ्रष्टाचाराचा आरोप असलेले शिक्षण मंत्री मेवालाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. जवळपास अर्धातास झालेल्या या बैठकीनंतर दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याचे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात होते. अखेर आज मेवालाल यांनी पदाचा राजीनामा दिला. मेवालाल चौधरी यांच्यावर सबौर विद्यापीठाचे कुलगुरू असतानाच्या काळात पदाचा गैरवापर करुन नियुक्ती केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल आहे.