कर्जतमध्ये तीन मिनीबस तर उरणमध्ये आठ दुचाकी जाळल्या







 

माथेफिरुंचा हैदास

कर्जतमध्ये तीन मिनीबस तर उरणमध्ये आठ दुचाकी जाळल्या

कर्जत/प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील पिंपळोली गावामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मिनीबस अज्ञात इसमांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. तर उरण तालुक्यातील उरण-भवरा येथे अज्ञाताने मोटरसायकली जाळल्याची घटना घडली आहे.

नेरळ पोलिस ठाणे हद्दीत पिंपळोली गाव असून या गावातील चंद्रकांत सोनावळे यांनी काही वर्षांपूर्वी स्कुल बसचा व्यवसाय सुरू केला.सध्या त्यांच्याकडे तीन मिनीबस असून त्यातील एक मिनीबसचे बँक लोनचे हप्ते आजही सोनावळे भरत आहेत. नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या हाजी लियाकत स्कुलमधील विद्यार्थ्यांना स्कुल बस म्हणून सेवा देत होते. साई एकविरा ट्रान्सपोर्ट या नावाने चंद्रकांत सोनावळे हे पिंपळोलीकर या नावाने वाहतूक व्यवसाय करायचे. पिंपळोली गावातील बँड पथकाला आर्थिक मदत देखील सोनावळे करायचे आणि गावात आणखी एक बँड पथक कार्यरत आहे. नजीकच्या काळात लग्नसराई सुरू होणार असून पिंपळोली गावातील बँड पथक हे मंगळवारी (ता. १७) नेरळ-कळंब रस्त्यावर पिंपळोली एसटी स्टँड परिसरात सराव करीत होते. त्यावेळी तेथे बँड पथकातील तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार देखील रात्री नोंदविण्यात आली होती.

पोलिसात तक्रार नोंदवून आल्यानंतर गावात शांतता असताना रात्री ११ वाजून ८ मिनिटांनी चंद्रकांत सोनावळे यांच्या साई एकविरा ट्रान्सपोर्टच्या तीन मिनीबस यांना आग लागली होती. गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला लावलेल्या मिनीबसला लागलेली आग एवढी भयानक होती की आग विझविणे कोणालाही शक्य झाले नाही आणि या आगीत तीन मिनीबस जळून खाक झाल्या. नेरळ पोलिसांना मिनीबसचे मालक चंद्रकांत सोनावळे यांनी याबाबत माहिती दिली असता, पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले.

आज, बुधवारी (ता. १८) सकाळी पोलिस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जळालेल्या मिनीबस यांची पाहणी करून परिसरात चौकशी सुरू केली. त्यावेळी नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नाननवरे यांच्यासह रायगड जिल्हा पोलिसांची गुप्तचर विभागाची टीम घटनास्थळी दाखल होती. साधारण १८ लाखांचे नुकसान अज्ञात इसमांनी लावलेल्या आगीत झाले असून नेरळ पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध आग लावून गाड्यांची नासधूस केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरळ पोलिस ठाणे आणि गुप्तचर यंत्रणा यांनी तपास सुरू केला असून मिनीबस आगीत भस्मसात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



-----------------------------------------------------------

भवरा येथे मोटारसायकली जाळल्या

उरण/प्रतिनिधी

उरण-भवरा येथे सोमवारी मध्यरात्री मोटारसायकली जाळल्याची घटना घडली. अज्ञात इसमाने ही आग लावली असून, त्याच्याविरोधात मोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (ता. १६) मध्यरात्री १ ते ३ वाजण्याच्यादरम्यान ही घटना घडली. अज्ञात इसमाने उरण भवरा येथे उभ्या असलेल्या मोटरसायकलींना आग लावली.

या आगीत एक-एक करुन आठ मोटरसायकली जळून खाक झाल्या आहेत. आगीत जळालेल्या गाड्यांची अंदाजे किंमत १ लाख ६२ हजार आहे.

या घटनेप्रकरणी मोरा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख हे करीत आहेत.















 


 






Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...