नागावमधील रुग्णांमध्ये ‘लेप्टो’ सदृश्य लक्षणे


नागावमधील रुग्णांमध्ये ‘लेप्टो’ सदृश्य लक्षणे

साडेसाती संपेना: कोरोना, चक्रीवादळ अन् आता लेप्टो 

अलिबाग/प्रतिनिधी 
कोरोना, चक्रीवादळ व आता लेप्टोसमान लक्षणे असलेल्या आजारामुळे नागावमधील नागरिकांत घबराट पसरली आहे. नागावमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी अद्याप पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. त्यातच आता नागावमध्ये लेप्टोसमान लक्षणामुळे नागरिकांचा मृत्यू झाल्याची चर्चा गावात सुरू असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. 



कोकण विभागात हा आजार विशेष करुन आढळतो. पर्यावरणात झपाट्याने होणारे बदल रासायनीक खतांच्या वापराने करण्यात येणारी आधुनिक शेती या व अशा अनेक कारणांमुळे किनारपट्टी लगतच्या परिसरात लेप्टो सारख्या प्राणीजन्य आजारांमध्ये वाढ होताना दिसते. प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा सुगीच्या काळात या आजाराचे रुग्ण आढळतात. दूषित प्राण्याच्या मलमुत्रामुळे दूषित झालेला परिसर हा या आजाराचा प्रमुख स्त्रोत असल्याचे डॉ. मकरंद आठवले यांनी सांगितले.


लेप्टो हा प्रामुख्याने जनावरात आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. लेप्टोस्पायरा या जीवाणूच्या २३ प्रजाती आहेत. उंदीर, घुशी तसेच अन्य पाळीव प्राणी यामुळे या आजाराचा प्रसार अधिक जोमाने होतो. पाळीव प्राणी तसेच शेतात काम करणार्‍या व्यक्तींना हा आजार होण्याची अधिक शक्यता असते. शेत मजुर, भातशेती करणारे लोक, कत्तलखान्यातील कामगार, मासेमार अशा व्यक्तींना या रोगाची विशेष करुन लागण होते. तसेच याचा संसर्ग झालेल्या जनावराच्या मुत्र, रक्त अथवा मांसाशी प्रत्यक्ष संपर्क आल्याने या आजाराचा प्रसार होतो. शरीरावरील जखम अथवा नाक, तोंड, डोळे यांच्या अभित्वचेमार्गे या रोगाचे जंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात.



या आजारात तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाजणे, डोळे सुजणे ही प्रमुख लक्षणे आहेत. मुञपिंडाचे व यकृताचे काम बंद पडून मृत्यू ही ओढवतो. ब़-याच वेळा रुग्णांची लक्षणे किरकोळ वा समजून न येणारी असतात यासाठी प्रत्येकाने कोरोनाप्रमाणेच लेप्टोच्या आजाराचीसुध्दा काळजी स्वताच घ्यावी. त्यासाठी दूषित पाणी, माती यांच्याशी संपर्क टाळणे तसेच हा आजार माणसापासून माणसाला होत नाही. दूषित पाण्याशी संपर्क ठेऊ नये, अपरिहार्य असल्यास रबर बुट, हात मोजे वापरावेत. भातशेतीत काम करणार्‍या शेतकरी बांधवांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्राण्यांच्या लघवीमुळे पाणीसाठे दूषित होऊ नयेत याचीही विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. प्रियांका नाईक यांनी सांगितले.


जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र
गेल्या काही दिवसात नागाव ग्रामपंचायत हद्दीत अचानक चार ते पाच ग्रामस्थांचे मृत्यू झाले आहेत त्यांच्यात लेप्टोच्या आजाराची लक्षणे आढळून आली आसल्याचे वाटते. त्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव पसरू नये तसेच नागरिकांना आपली जीव गमवावा लागू नये यासाठी प्रतिबंधनात्मक उपायोजना लागलीच करावी तसचे जनजागृती करावी यासाठी नागाव ग्रामपंचायतीमार्फत आजच जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र दिले असल्याचे नागाव ग्रापंचायतीचे सरपंच निखिल मयेकर यांनी सांगितले.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...