प्रसोलच्या रासायनिक उत्पादनावर बंदी
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश; आमशेत ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखलमहाड/प्रतिनिधी
महाड एमआयडीसीतील प्रसोल केमिकल्स या कारखान्यातील उत्पादन थांबवण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्याने केमिकल्समधील उत्पादन प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. या कारखान्यातील दुर्गंधी आणि वायू प्रदूषणाने त्रस्त झालेल्या जवळच्या आमशेत ग्रामस्थांनी हा कारखाना बंद करण्याची मागणी केली हाती. त्यानुसार ग्रामस्थांच्या या दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावण्यात येऊन कारवाई केली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्गंधी व प्रदुषण रोखणार्या उपाययोजना आखल्याशिवाय उत्पादन घेऊ नये असे निर्देश कंपनी व्यवस्थापनाला दिले आहेत. प्रसोल कारखान्यामुळे वायू व जल प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी आमशेत गावातील ग्रामस्थांनी केल्या होत्या. १४ नोव्हेंबर २०२२ ला कारखान्यात एका स्थानिक कामगाराचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ व विशेष करुन महिलांनी कंपनी विरोधात आंदोलन केले.
आमशेत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत प्रसोल केमिकल्स हा कारखाना बंद करण्यात यावा अशी मागणी केली होती.
ग्रामस्थांच्या या भूमिकेची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखान्याला उत्पादन थांबवण्याची नोटीस बजावली आहे. जोपर्यंत दुर्गंधी आणि प्रदूषण उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत या कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया बंद ठेवण्यात यावी, उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यानंतर त्या यंत्रणेची प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकार्यांसमोर आणि आमशेत ग्रामस्थांसमोर तिची चाचणी घेतली जावी, ही चाचणी यशस्वी झाल्याची खात्री झाल्यानंतरच उत्पादन सुरु करण्यात यावे असे या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या सल्ल्यानुसार सातत्याने कारखान्याच्या परिसरातील गावागावांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देशही या नोटीसीमध्ये देण्यात आले आहेत. प्रसोल ही या भागातील मोठी कंपनी असल्याने कारखाना बंदचा फटका कामगार वर्गालाही बसणार आहे.