रिक्षा मीटर भाड्यासाठी आरटीओचा ऍक्शन प्लॅन
महापालिका, वाहतूक खाते पालखीचे भोईः पनवेल संघर्ष समितीने लावली ताकद पणाला!
कळंबोली//@निर्भीड लेख वृत्त
रिक्षा मीटर आणि शेअर रिक्षा दोन्हींचा तिढा सोडवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आता आरटीओ, वाहतूक खाते आणि पनवेल महापालिकेच्या खांद्यावर सोपविण्यात पनवेल संघर्ष समिती यशस्वी झाली आहे. तर तिन्ही शासकीय यंत्रणांनी कठोर उपाय राबविण्याचा मानस केला आहे. त्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. त्याची आठवडाभरात पुर्ण तयारीनिशी अंमलबजावणी सुरु होईल, अशी ग्वाही पनवेलचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी दिली.
पनवेल संघर्ष समितीने पूर्वनियोजित बैठकीत रिक्षा मीटरचा तिढा आज आरटीओ, वाहतूक खाते आणि महापालिकेच्या माथी मारला. प्रवाशांना नरक यातनेतून बाहेर काढा, हे आंदोलन मुजोर रिक्षा चालकांविरोधात आहे. सरसकट रिक्षा चालकांविरोधात नाही. पण रिक्षा चालकांच्या डोक्यात अनेक प्रकारचे पिल्लू सोडून त्यांची दिशाभूल केल्याने हा गुंत्ता वाढत चालला आहे, असा ठोस युक्तिवाद पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केला. त्यावर मार्ग काढताना पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, खारघर व तळोजे शहरात रिक्षा मीटरप्रमाणे धावतील, मीटरप्रमाणे भाडे न आकारले गेल्यास कारवाई होईल आणि त्यासाठी आरटीओने हेल्पलाईन नंबर घोषित केला आहे. यासंदर्भातील काही सूचनांचे दोन हजार फलक महापालिका क्षेत्रात आठवड्याभरात नाक्यानाक्यावर लावून रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यात जनजागृती केली जाईल. त्याची जबाबदारी महापालिकेचे उपस्थित उपायुक्त (मालमत्ता व वाहन) गणेश शेट्ये यांनी घेतली आहे.
तर पनवेल पुर्व व पश्चिम भगातील तसेच खारघर, खांदेश्वर रेल्वे स्टेशनवर आरटीओ आणि वाहतूक खाते स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाईची सक्तीची मोहीम तातडीने सुरु करुन रिक्षा मीटरची अंमलबजावणी करण्यास सज्ज झाले असल्याचे यावेळी अनिल पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त भागवत सोनावणे आणि वाहतूकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनुक्रमे संजय नाळे(पनवेल), हरिभाऊ बाणकर (कळंबोली), योगेश गावडे (खारघर) व सुनील कदम (तळोजे) यांनी सांगितले.
शेअर रिक्षा चालकही मीटरने व्यवसाय करू शकतात. तसा कायदा अस्तित्वात आहे. शहरातील रिक्षा चालकांना मीटरप्रमाणेच भाडे आकारावे लागेल, अशी तंबी देताना अल्पप्रमाणातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे अत्यंत क्लिष्टपणे काम करावे लागत आहे. त्यात राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील अपघातशून्य प्रवासाची मोठी मोहीम राबवूनही गेल्या महिनाभरात रिक्षा चालकांची दादागिरी मोडून काढताना मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याची माहिती पाटील यांनी दिली.
संघर्षच्या वतीने चर्चेत कांतीलाल कडू, ९५ गाव प्रकल्पग्रस्त शेतकरी आंदोलनाचे नेते सुरेश ठाकूर, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, ऍड. विजय गावडे, माजी सरपंच अनिल ढवळे आदींनी सहभाग घेतला. सहआरटीओ गजानन ठोंबरे, मोटार निरीक्षक निलेश धोटे, म्हापालिकेचे अधिकारी राजेश डोंगरे आदी अधिकारी तर संघर्षच्या वतीने तालुकाध्यक्ष डॉ. हेमंत पाटील, शहर अध्यक्ष हरेश पाटील, करंजाडे विभागीय उपाध्यक्ष किरण करावकर, कोळीवाडा अध्यक्ष किरण पवार आणि नारायण खुटले उपस्थित होते.
चर्चेतील महत्वाचे मुद्देः
- रिक्षा मीटरप्रमाणेच चालतील
- प्रत्येक नाक्यावर व मोक्याच्या ठिकाणी प्रबोधन आणि जनजागृतीसाठी फलक लावले जातील
- प्रत्येक रिक्षा नाक्यावर तपासणी मोहीम सुरु राहिल
- आसनक्षमतेच्या नियमांचे भंग केल्यास फौजदारी व दंडात्मक कारवाई
- शेअररिक्षाही नियमाप्रमाणे चालतील
- रिक्षा चालकांशीही अधिकारी संवाद साधतील
- महापालिका क्षेत्रात प्रवाशांनी रिक्षा मीटरची मागणी करावी
- रिक्षा चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या संघटनांनी पुढाकार घ्यावा