रामशेठ ठाकूरांच्या 'रामबागेचे पातक'
मंदिर ट्रस्टींच्या माथी!
- * ठाकूरांनी स्वतःची कातडी वाचवत दिला मंदिर ट्रस्टींचा बळी
- * पोलिसांनी कागदपत्रे मागवताच म्हसेश्वर ट्रस्टींमध्ये खळबळ
पनवेल/निर्भीड लेख वृत्त
न्हावेखाडी येथील शेतकरी, सर महम्मद युसूफ ट्रस्ट आणि सिडकोची पाचशे कोटींपेक्षा अधिक रक्कमेची मोक्याची साडेबारा एकर जागा ‘रामबाग’साठी हडप केल्यानंतर ठाकूरांच्या मागे शुक्लकाष्ठ लागले आहे. त्यातही रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतःची कातडी वाचवून म्हसेश्वर मंदिर ट्रस्टचा बळी दिला आहे.
न्हावे येथील तरुण निशांत राघो म्हात्रे याचा रामबागेसाठी अनधिकृत बांधण्यात आलेल्या स्पीडब्रेकरवर गेल्या वर्षी 22 डिसेंबरला झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यावर निशांतची आई कमला म्हात्रे यांनी न्हावा शेवा पोलिस ठाण्यात ‘रामबाग’चे मालक आणि विश्वस्तांविरोधात गुन्हा नोंदवण्याची रास्त मागणी केली होती. मात्र, न्हावा शेवा पोलिसांनी बाजूच्या म्हसेश्वर मंदिर ट्रस्टविरोधात निशांतच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून गुन्हा नोंदवण्याची चलाखी आणि तत्परता दाखवली. पोलिसांनी कुणाच्या अर्थनितीला भुलून गुन्ह्याचा रोख बदलला, याची उघड चर्चा सुरु झाली आहे. या गुन्ह्यात मंदिर अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर उर्फ सी. एल. ठाकूर आणि अन्य विश्वस्तांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सिडको अधिकार्यांना खिशात घालत माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको, सर महम्मद युसूफ ट्रस्ट आणि शेतकर्यांच्या मालकीची साडेबारा एकर न्हावा शेवा सी-लिंक शेजारची मोक्याची जमिन हडप केली आहे. त्यावर अत्याधुनिक बाग उभारून स्वतःचे नाव देण्याची हौसही ठाकूरांनी पुरवून घेतली. या जमिनीची बाजार भावाप्रमाणे किमान पाचशे ते सातशे कोटी रुपये किंमत आहे. अनधिकृत बागेच्या उद्घाटनाला राज्यातील कुणी बडा नेता, मंत्री न मिळाल्याने त्यांनी आंबट तोंडाने नातू अमोघ प्रशांत ठाकूर याच्या हस्ते उद्घाटन केले.
बाग उभारून, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जासई-न्हावा मार्गावर बागेकडे वळण घेण्यासाठी ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीने बेकायदेशीर गतिरोधक निर्माण केले. तिकडे झेब्रा क्रॉसही स्व:मर्जीने रंगविण्यात आला. मात्र, काही दिवसात न्हावे येथील निशांत म्हात्रे या तरुणाचा त्या गतिरोधकावर मोटरसायकल अपघात झाला आणि उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी सार्वजनिक बांधकाम खाते उरण यांच्याकडून माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली असता, ते गतिरोधक माजी खा. रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या टीआयपीएल कंपनीने अनधिकृतपणे बांधले होते, असे उघड झाले. अपघात झाल्यानंतर रातोरात ते स्पीडब्रेकर टीआयपीएलने काढून टाकून या गुन्ह्यातील पुरावा नष्ट केला. तरीही पोलिस गप्प राहिले.
या संदर्भात, म्हसेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत लहू ठाकूर यांच्यासह विश्वस्तांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रमाणे भादवि 304 (अ) वगैरे गुन्हा दाखल करून ठाकूरांची कातडी पोलिसांनी वाचविली आहे. यातून ठाकूरांच्या अर्थनितीला पोलिस बळी पडल्याचे सपशेल दिसत आहेत.
उच्च पदस्थ अधिकार्यांनी चौकशी केल्यास बिंग फुटणार
पोलिसांनी टीआयपीएल आणि रामबाग विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करण्याऐवजी स्वतःच्या बाग विश्वस्त मंडळातील नातेवाईकांचा बचाव करत मंदिर ट्रस्टला कायद्याच्या जबड्यात रामशेठ ठाकुरांनी ढकलून दिले आहे.
काय आहे कलम 304 अ?
निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे: जो कोणी दोषी मनुष्यवधाचे प्रमाण नसलेले कोणतेही अविचारी किंवा निष्काळजी कृत्य करून कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल, त्याला दोन वर्षांपर्यंत वाढू शकेल अशा मुदतीच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
कोण आहेत म्हसेश्वर मंदिराचे ट्रस्टी?
चंद्रकांत लहू ठाकूर, मदन एकनाथ ठाकूर, श्याम आत्माराम ठाकूर, सुजित रतन ठाकूर, अनंत माणिक ठाकूर, शिवाजी सावळाराम ठाकूर, तुकाराम नारायण ठाकूर, शांताराम रामचंद्र ठाकूर (मयत), सदाशिव अनंत ठाकूर, विरेंद्र नामदेव ठाकूर, अनंत वामन ठाकूर, रमण शांताराम ठाकूर, प्रल्हाद केशव ठाकूर, बामा चंदर ठाकूर आदी जण बाजूच्या मंदिराचे ट्रस्टी आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
आता या सर्वांनाच न्हावा शेवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल शिंदे यांनी प्रतिबंधक नोटीस बजावली होती. त्याकरिता संबंधितांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड पोलिसांनी मागितले आहे. यामुळे त्या विश्वस्तांच्या अंगलट हे प्रकरण आले असल्याने खळबळ माजली आहे.
रामशेठ ठाकूरांचा खोटारडेपणा उघड!
न्हावा शेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल शिंदे यांनी या गुन्ह्याचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्याची तयारी सुरु केल्याने संबंधित आरोपींच्या ओळखपत्राकरिता आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स प्रत मागितल्याने हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी मंदिर ट्रस्टीतील दोघांनी रामशेठ ठाकूर यांना वरच्या पट्टीत छेडले असता, मंदिराच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी कागदपत्रे मागविली असल्याची सपशेल थाप मारली. मात्र, काही ट्रस्टींनी गोंधळ घालून कागदपत्रे देण्यास तीव्र विरोध केला.
तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दुरान्वये संबंध नसताना पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला, याच्या चौकशीची मागणीही ते विश्वस्त करणार असल्याचे सांगून ठाकुरांना चांगलेच कात्रीत पकडले आहे.
राज्याचे मुख्य सचिव याकडे लक्ष देतील काय?
पाचशे ते सातशे कोटींची सिडको व शेतकर्यांची जमिन हडप करुन तेथील कांदळवन नष्ट केले गेले आहे, याचा सबळ पुरावा गुगल मॅपवर असतानाही पनवेल महसूल, उरण वनखाते, सिडको अधिकारी विकले गेल्यासारखे वागतात. तर दुसरीकडे अलीकडेच रोडपाली तेथील शंकर मंदिर पनवेल महापालिकेने पाडले. राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक हे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कांदळवन संरक्षण समितीचेही प्रमुख असल्याने त्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता सैनिकांनी साडेबारा एकर जमिनीवरील कांदळवन रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी तोडून सिडकोची जमिन हडप केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे धाडस दाखवावे, असे खुले आव्हान त्यांना पर्यावरण प्रेमींनी दिले आहे. तसेच सिडकोच्या अतिक्रमण विभागातील खोगीर भरतीतील अधिकार्यांना दिले आहे.