बदल हा सृष्टीचा स्थायीभाव: डहाणे
पनवेल/निर्भीड लेख वृत्त
बदल, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. बदल सर्व क्षेत्रात होत राहतात. ते बदल आपण अंगीकारायला हवेत. त्या प्रवाहाप्रमाणे पुढे जात विचारांचेही मंथन केले पाहिजे, अशी वैचारिक फराळाची मेजवानी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातंर्गत असलेल्या परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी उपस्थितांना दिली.
दै. निर्भीड लेखच्या 27 व्या दिवाळी विशेषांकाप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी त्यांच्या शुभहस्ते देखण्या, मनमोहक आणि वैचारिक व्यासपीठ असलेल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर उद्योजक व आदर्श नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कॉलनी फोरमच्या अध्यक्षा, माजी नगरसेविका लीना गरड, कॉंग्रेसच्या महिला जिल्हा आघाडी प्रमुख निर्मला म्हात्रे, संपादक कांतीलाल कडू उपस्थित होते.
हाताची पाचही बोटं जशी सारखी नसतात, तशी अनेक विचारांची माणसं समाजात असतात. कुणाबद्दल व्यक्तिगत द्वेष न बाळगता वैचारिकतेमधून समाज प्रगल्भ करता आला पाहिजे. त्यासाठी नव्या युगाच्या हाका ऐकून काळानुरूप आपल्यात बदल घडविता आले तर समाज अधिक पोषक होईल, असा दावाही डहाणे यांनी केला.
दै. निर्भीड लेखच्या दिवाळी अंकातील लेख निवडीवर बोलताना डहाणे यांनी कांतीलाल कडू यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. वाचकांना नेमकी काय हवं ते देता आले पाहिजे. आताचे युग हे संगणकीय आहे. त्यात कोविड साथीनंतर अनेक संकल्पनांना छेद मिळाला आहे. वर्तमान पत्र असोत की दूरचित्रवाहिन्या सर्वच दृष्टीने मागे पडल्या आहेत. आता त्यांचा टीआरपी घसरला आहे. नव्या युगाप्रमाणे नवी पिढी मोबाईलवर सर्व काही शोधत असल्याने त्यांची वाचनाची भूक भागत आहे. त्यात लिहिण्याचा सरावही मागे पडत चालला आहे, असे ते म्हणाले.
ऑनलाईन, ई-पेपरचा सध्या जमाना आला आहे. निर्भीड लेखपासून लोकसत्तासुद्धा पीडीएफमधून वाचायला मिळत असल्याने आताच्या पिढीला पुस्तक वाचणे वैगरे बोजड वाटत असल्याची खंत त्यांनी मिश्किलपणे व्यक्त केली.
हाडाच्या पत्रकारांचे फार मोठे नुकसान होताना दिसते. सध्याची पत्रकारिता पाहिली तर काही तरी हेतूने पत्रकारिता होताना दिसत आहे.समाजाला काय द्यायचे आहे? काय वाचवायचे आहे? याचा पत्रकारांनी विचार केला पाहिजे. बाजारात काय मटेरियल आहे, वाचकांना काय दिले पाहिजे, ज्यामुळे वाचकांना आनंद होईल.
मला वाटतं चांगले पत्रकार हा विचार जरूर करतात. तेच समाजाला न्याय देवू शकतात, असे परखड मत पंकज डहाणे यांनी मांडले. मुख्य अतिथी पंकज डहाणे यांचे स्वागत भेटवस्तू देवून नितीन मढवी (उलवे), जे. एम. म्हात्रे यांचे स्वागत भास्कर भोईर (मोहो), निर्मला म्हात्रे यांचे स्वागत माधुरी गोसावी (पनवेल) तर लीना गरड यांचे स्वागत रेश्मा ठाकूर (धुतुम) यांनी केले.
कार्यक्रमाचे खुसखुशीत सूत्रसंचालन युवा नेते विजय काळे यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. राजेंद्र राठोड यांनी मानले.
श्रीमंतीचा गर्व नको, घरं बांधतो पण शेवटी स्मशानात जावं लागतं: जे. एम. म्हात्रे
कांतीलाल कडू यांचे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम उत्तम असतात. वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते. त्याच अनुषंगाने आज निर्भीड लेखच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन झाले. या अंकात सर्वपक्षीय नेत्यांबद्दल लिहिले आहे. चुकीवर खडेबोल तर चांगल्या कामांवर कौतुकाची थापही आहे. कुठेही भेदभाव नाही, असे मत प्रसिद्ध उद्योजक जे. एम. म्हात्रे यांनी व्यक्त केले.
दुसरीकडे काही लोकं नाव झाले की, पोशाख सुंदर असावा, घर मोठे असावे अशी अपेक्षा करतात. पण परमेश्वराने ठरवले की, त्यांच्यापुढे ‘स्वर्गीय’ लावतो. कपड्यांच्या जागी कफन असते, घराच्या जागी ‘स्मशान’ असते. त्यामुळे कधीही संपत्तीचा गर्व करू नये. संपत्तीची चमक ये-जा करीत असते. मात्र कधी कुणाचा अपमान करू नका. मारहाण केलेले व्रण निघून जातात; मात्र अपमानास्पद वापरलेल्या शब्दांची जखम खोलवर असते, असे परखड मत म्हात्रे यांनी व्यक्त केले.
पनवेलचा महागणपती ही वेगळी ओळख कांतीलाल कडू यांनी निर्माण केली आहे. चांगल्या कार्यात समाज पाठीशी असतो, याची प्रचिती त्यांना येत असेल असे सूचक आणि तितकेच गंभीर्यपूर्ण संकेत, राजकारणावर काही बोलणार नाही म्हणतानाही म्हात्रे यांनी अतिशय मिश्किलपणे दिले. तर सद्य:स्थितीवर भाष्य करताना सगळं मलाच कसं हवं यावर मृत्यूची कल्पना देत अनेकांना कानपिचक्याही दिल्या, त्याची चर्चाही सभागृहात पिकली होती.
मालमत्ता करविरोधी लढ्यात कांतीलाल कडू यांचे भरीव योगदान!
आज कांतीलाल कडू यांनी निर्भीड लेख या अंकाचे प्रकाशन केलं आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते. गेल्या 30 वर्षांपासूनन ते पत्रकारितेत आहेत. तर सलग 27 वर्षे दिवाळी अंक प्रकाशित करीत आहेत. ते निर्भीडपणे प्रत्येक लेख, मत मांडत आहेत. कुठेही घाबरत नाहीत. समाजामध्ये कुणावर अन्याय होत आहे, चुकीच्या गोष्टी होत आहेत. त्याच्यावर एकदम आक्रमकपणे लिहित आहेत. याचे मला खूप कौतुक आहे, असे मत माजी नगरसेविका लीना गरड यांनी मांडले.
समाजामध्ये अनेक ठिकाणी अन्याय घडत आहे. देश पातळीवर बघितला तर खूप हल्ल्याच्या घटना घडत आहेत. आजचा जो काळ आहे तो कलियुग आहे. कलियुगामध्ये आपल्याला बोललंच पाहिजे, विरोध केलाच पाहिजे. गप्प बसून चालणार नाही. असं म्हणतात की, अन्याय करणार्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. त्याचप्रमाणे आपण आता वागलं पाहिजे. आज आपण पाहत आहोत की, पनवेल महानगरपालिका कशाप्रकारे आपल्यावर अन्यायकारक पद्धतीने बेकायदेशीरपणे कर आकारत आहे. हा कर जर आकारला तर आपल्याला पिढ्यान्पिढ्या कर भरावा लागणार आहे. जर आपण याला आताच विरोध केला नाही तर पुढे आपल्याला दहापटीने भरावे लागणार आहे. तर आपण उत्तर दिलेच पाहिजे. विरोध केलाच पाहिजे. ही लढाई कुणा एकट्याची नाही, सर्वांची आहे. कारण मालमत्ता सर्वांचीच आहे. आपल्याला कर भरणे बंधनकारक आहे. त्याच्यामुळे ही लढाई सर्वांनी आक्रमकपणे लढली पाहिजे. त्यामध्ये कांतीलाल कडू यांचाही मोठा सहभाग राहिला आहे. त्यांनी लेखाच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठे सहकार्य केले आहे, अशा शब्दात कडू यांच्या मालमत्ता करविरोधी लढाईच्या योगदानाबद्दल गरड यांनी कौतुक केले.
महापालिका प्रशासनावर हलकेसे ओरखाडे ओढताना, आजही नव्वद टक्के मालमत्ताधारकांनी कर भरले नाही. मात्र पालिका कर भरल्याचा दिंडोरा पिटून बुद्धीभेद करत असल्याचे लीनाताई गरड यांनी सांगितले.
कांतीदादांनी आमदार व्हावे ही ओवाळणी मागते: निर्मला म्हात्रे
पत्रकार आणि माझे भाऊ कांतीलाल दादा हे त्यांच्या निर्भीड लेखणीतून सामाजिक आणि राजकीय आसूड ओढत असतात. निर्भीड लेखमधून वाचकांना अनेक विषयांवर विचार करायला भाग पाडून जनजागृती करीत आहेत. आत्ताच्या भीषण राजकीय घडामोडींमध्येही कांतीलाल कडू हे आपले मत खंबीरपणे लिहित असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका निर्मलाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले.
सध्या प्रिंट मीडिया, डीजिटल मीडिया या सगळ्यांवर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पत्रकारांच्या लेखणीला एक प्रकारचा लगाम लागलेला आहे. कारण तुम्ही जर काही विरोधात लिहिलात, तर तुमच्यावर सूडकारवाई होते. राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक दृष्टीने तुमची कोंडी केली जाते. मात्र या सर्व गोष्टींना कांतीलाल कडू हे अपवाद ठरत असल्याचे निर्मला म्हात्रे यांनी म्हटले आहे.
आताच्या विपरीत परिस्थितीत दैनिक चालविणे, दिवाळी अंक प्रकाशित करणे हे खूप कठीण आहे. तसेच, खूप खर्चिक देखील आहे. म्हणूनच सध्या मीडियामध्ये पत्रकारिता विकल्यावरच तुम्ही पत्रकार होऊ शकता आणि तुमचं वर्तमानपत्र चालू शकतं, अशी परिस्थिती आहे. मात्र, कांतीलाल कडू यांनी स्वाभिमान जपत पत्रकारिता जपली असल्याचे निर्मलाताई म्हात्रे यांनी म्हटले.
कांतीदादा आपल्या सगळ्यांना वैचारिक व्यासपीठ देत आहेत आणि त्यातूनच आपल्याला आपल्या भवितव्याची आणि परिस्थितीची जाणीव होत आहे. तुम्हाला महिला कॉंग्रेसकडून आणि माझ्या सर्व कुटुंबीयांकडून आगामी यशासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आता थांबायचं नाही... पुढे जायचं आहे. कारण राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात काम करणार्या निर्भीड व्यक्तीची समाजाला गरज आहे. आताच्या परिस्थितीमध्ये निर्भीड माणसं पुढे येणं आणि सर्वसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी येणार्या काळामध्ये मला पत्रकार कांतीदादा राजकारणातील यशाच्या क्षितिजावरती हवा आहे, हीच भाऊबीजेची मागणी करते. ‘अकेले चलना पडे तो डरिये मत, क्यूंकि शिखर और सिंहासन पर इंसान अकेलाही होता है, अशी शेरोशायरी म्हणत माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे यांनी कांतीलाल कडू यांना शुभेच्छा दिल्या.
प्रकाशन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी
उद्योजक विलासशेठ कोठारी, माजी नगरसेवक रमेश गुडेकर, कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे सल्लागार, माजी नगरसेवक शशिकांत बांदोडकर, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शेखर जळे, नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष वामनशेठ शेळके, ऍड. प्रफुल्ल म्हात्रे, शेकापच्या माजी महिला आघाडी प्रमुख माधुरी गोसावी, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज, माजी उपनगराध्यक्ष अनिल टेमघरे, माजी नगरसेवक अच्युत मनोरे, विश्वास म्हात्रे, शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या अर्चना कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अमित दवे, मनसेचे नवीन पनवेल महानगर प्रमुख योगेश चिले, जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण, शहर प्रमुख पराग बालड, उपशहरप्रमुख संदिप जाधव, ऍड. संतोष सरगर, ज्येष्ठ पत्रकार घन:श्याम मानकामे, साहित्यिक आणि कोकण साहित्य परिषदेचे माजी जिल्हा कार्यकारणी सदस्य सी. सी. मढवी, पोलिस दलाचे वैद्यकीय अधिकारी आणि साहित्यिक डॉ. राजेंद्र राठोड (अंधेरी), पेपर विक्रेते पप्पू काळंगे, विस्टा फूडचे व्यवस्थापक आनंद पाटील, प्रिया पाटील, रूपा कडू, बोनी स्कुलचे संचालक सुनील बंधू, संतोष शुक्ला, डॉ. हेमंत पाटील, योगेश पगडे, गणेश वाघीलकर, भूषण साळुंखे, सचिन पाटील, महादूशेठ पाटील, विकी खारकर, किरण करावकर, हरेश पाटील, तेजस म्हसकर, सुरज म्हात्रे, वैभव जोशी, अमित चवळे, दीपक कांबळे, वसंत ठाकूर, कार्तिक पाटील, विष्णू पाटील, सुनील भोईर, बाळा पाटील, सतेज म्हात्रे, रणजित ठाकूर, विनोद ठाकूर , विनोद घरत, रेश्मा ठाकूर, लीलाधर घरत, निलेश पाटील, राम पाटील, कैलास घरत, हर्षल ठाकूर, प्रेम पाटील, मयुरी ठाकूर, मेघनाथ ठाकूर, शुभांगी ठाकूर, रंजना ठाकूर, किशोर पाटील, नितीन मढवी, अविधा मढवी, नवीन मढवी, अरविंद कडव, सुषमा उतेकर, किरण कडू, तानाजी अरिवले, दशरथ पाडेकर, मधुकर पाटील, नितीन कडू, राम पाटील रत्ना बडगुजर, गणेश बडगुजर, प्रभाकर घुले, मनोहर उरणकर, प्रतिमा मुरबाडकर, व्ही. एल. वाणी, देशमुख, जागृती भगत, सुनंदा भगत, श्रीराम गायकर, पारधी काका, संजय यादव, निलेश काकडे, संतोष पवार, बाळाराम पाटील, विलास काळे, सचिन गायकवाड, बंडू देशमुख, अण्णा बन्सर, जगदिश पारधी, रामदास म्हात्रे, पंकज वारदे, बाळकृष्ण पाटील, भालचंद्र तांबोळी, शाम भगत, संतोष शेळके, प्रमोद भालेकर, प्रकाश खुटले, सुवास भगत, रामदास घाडगे, रघुनाथ पाटील, विजय केवाळे, बाळकृष्ण बुवा शिंदे, एकनाथ मते, मच्छिंद्रनाथ महाडिक, बाळू शेळके, सुनील महाडिक, चंद्रकांत पाटील, भीम सिकंदे आदी मान्यवर उपस्थित होते.