आईच्या ओढीने अडीच वर्षानंतर
लागले पाटलांचे पनवेलला पाय!
पुढच्या दीड महिन्यात जामीन मिळणार असल्याचा पाटलांचा दावा
पनवेल/निर्भीड लेख वृत्त
वृद्धापकाळाकडे झुकलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेताना माऊलीच्या डोळ्यात मुलाच्या सुटकेचा हुंकार दडल्याने मातेच्या भेटीसाठी माजी आमदार विवेक पाटील ऐन दिवाळीत पनवेल भूमीत तब्बल अडीच वर्षानंतर आले होते. शेकापमधील त्यांच्या समर्थकांना अवचित घडलेली दिवाळी भेट नवचैतन्य देणारी ठरली. तर मातेच्या डोळ्यातील आभाळ फाटून महापूर ओसंडून वाहत होता....!
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळ्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलणारा आधुनिक ‘वाल्या कोळी’ ठरलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील तळोजा कारागृहात आहेत. 2004 ते 2016 पर्यंत त्यांनी बँकेच्या तिजोरीतून 110 कोटींची रोकड खर्ची केली आहे. बँकेचा परतावा परत करण्यास असमर्थ ठरलेल्या पाटलांनी शेवटचा पर्याय म्हणून ती रक्कम 63 कर्ज खात्यात वळती केली. पण ते कर्जही फेडता न आल्याने व्याजासह साडे पाचसे कोटींच्या घरात हा घोटाळा पोहचला आणि विवेक पाटलांना कारागृहात जावे लागले.
ईडीने अटक केल्यानंतर त्यांना अडीच वर्षातही जामीन झालेला नाही. त्यांच्या मातोश्री पार्वती शंकर पाटील यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना निकम परमार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. मातोश्रींना अटकेत असलेल्या मुलाची आठवण काळीज चिरणारी ठरत आहे.
आईच्या प्रकृतीची चौकशी आणि गळाभेट घेण्यासाठी विवेक पाटील यांनी न्यायालयातून परवानगी घेत दोन दिवसांपूर्वी कडेकोट पोलिस बंदोबस्तात रुग्णयालयात जावून मातोश्रींची भेट घेतली. कातरलेल्या दोन्ही मनांनी संवाद साधला. यानिमित्ताने अनेक कार्यकर्त्यांनी विवेक पाटलांचे दर्शन घेतले.
राज्यातील कारागृहातील आरोपींच्या भेटीगाठीवरून वातावरण तापलेले असल्याच्या पार्श्वभूमीवर तळोजा कारागृहातील बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी सजगता ठेवली होती. त्यामुळे हातवारे आणि इशार्यांवर अनेकांना समाधान मानावे लागले होते.त्यातही कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेवून पुढच्या दीड महिन्यात जामीनावर बाहेर येईन, असा आशावाद विवेक पाटील सबुरीने पेरत होते.
तालुक्यातील शेकडो समर्थकांनी त्यांचे डोळे भरून दर्शन घेत शेवटी नेत्याला अश्रू लपवत कारागृहात जाण्यासाठी निरोप दिला.