मुंबई ऊर्जाचे काम बंद म्हणजे बंद!
- पोलिस प्रशासनाची यशस्वी मध्यस्थी
- महाविकास आघाडीची एकजूट सरकारच्या छातीवर नाचली!
दिवसभर अंगावर ऊन घेत आंदोलनाची पाठशाळा रेटाने सुरु ठेवणार्या टेंभूर्डे संघर्ष समिती आणि महाविकास आघाडीने अखेर मुंबई ऊर्जा प्रकल्पाधिकारी आणि राज्य सरकारला नमवत काम बंद आंदोलन यशस्वी केले. पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी शिष्टमंडळाच्या विनंतीनुसार यशस्वी मध्यस्थी करून उद्या कंपनीचे काम बंद ठेवण्याचा निर्णय घोषित केला.
पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी राहुल मुंडके, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील तर शिष्टमंडळात माजी नागराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कॉंग्रेसचे रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष कांतीलाल कडू, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. आर. पाटील, प्रवक्ते शशिकांत बांदोडकर, उबाठा शिवसेना गटाचे एकनाथ म्हात्रे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
या बैठकीत डहाणे यांनी दिवसभरातील घडामोडी आणि दुपारी झालेल्या बैठकीची शिष्टमंडळाला माहिती दिली. त्याशिवाय काम बंद करण्याच्या मागणीला मुंबई ऊर्जा प्रा. लि. कंपनी आंदोलनकर्त्यांच्या मागणीशी सहमत नसल्याचे सांगितले. त्यावर आंदोलनकर्त्यांची भूमिका आणि यशस्वी तोडगा काढण्यासाठी कांतीलाल कडू, जे. एम. म्हात्रे, जी. आर. पाटील आदींनी काही मुद्दे मांडले. त्यावर डहाणे यांनी पूर्णतः सहकाराची भूमिका स्पष्ट केली. मात्र, कंपनी काम बंद करण्यास राजी नसल्याचे सांगितले. त्यावर आंदोलकांची बाजू शिष्टमंडळाने जोरदार लावून धरली. शेवटी अतिशय खेळीमेळीच्या आणि आंदोलकांच्या भूमिकेतून शिष्टमंडळाला निर्णय देताना उद्या काम बंद करण्यासाठी कंपनी प्रशासनाला डहाणे यांनी निर्देश देवून शांततेत मार्ग काढला.
गेल्या दोन महिन्यांपासून टेंभूर्डे संघर्ष समिती मुंबई ऊर्जा प्रा. लि. कंपनीसोबत दोन हात करत आहे. त्याचे पर्यवसान आज आंदोलनात झाले. शेकडो पोलिसांची छावणी भेदत आंदोलकांनी माजोरड्या प्रशासनाविरोधात रौद्ररूप धारण केले.
पोलिसांनी धरपकड केली. महिला आणि पुरुष आंदोलकांना गाडीत कोंबून खांदेश्वर आणि नवीन पनवेल पोलिस ठाण्यात नेले.
तिकडे माजी आ. बाळाराम पाटील, बबनदादा पाटील, भाई आर. सी. घरत, सुदाम पाटील, प्रकाश म्हात्रे, ज्ञानेश्वर पाटील, विष्णू जोशी, हेमराज म्हात्रे आणि शेकडो नागरिकांनी असहकार आंदोलन पुकारले.
त्यानंतर आंदोलक, पोलिस प्रशासन, कंपनी प्रशासन यांची संयुक्तिक बैठक घेतली, मात्र कंपनी प्रशासनाच्या हेकेखोरी भूमिकेमुळे वातावरण चिघळले. त्यानंतर माजी आमदार बाळाराम पाटील यांनी असहकार भूमिका घेतली आणि पोलिस व्हॅनमध्ये झोकून दिले. आंदोलनकर्त्यांनी त्यांना एकजुटीने पाठींबा दिला.
काही वेळाने कांतीलाल कडू यांनी बाळाराम पाटील, बबनदादा पाटील यांच्याशी चर्चा करून शिष्टमंडळ घेवून पोलिस उपायुक्त यांच्याकडे जाण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या यशस्वी चर्चेतून कंपनीला काम बंद करण्यास भाग पाडले.
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, बबनदादा पाटील आणि कांतीलाल कडू यांनी आंदोलनकर्त्यांसमोर यथोचित मार्गदर्शन करून आंदोलन यशस्वी झाल्याचे घोषित केले.
उद्या, रविवारी (ता. 19) दुपारी 1 वाजता टेंभूर्डे संघर्ष समितीच्या कार्यालयात बैठक होणार आहे. तर सोमवारी रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात होणार्या बैठकीची रूपरेषा ठरविण्यात येईल, असे बाळाराम पाटील यांनी घोषित केले.