मुंबई ऊर्जाविरोधात आंदोलन
तीव्र करण्यासाठी 'व्युहरचना'
- जिल्हाधिकार्यांनी दिली निवेदन स्वीकारण्यास वेळ, बैठक टाळली
पनवेल/निर्भीड लेख वृत्त
शेतकर्यांच्या जमिनीत घुसलेला मुंबई ऊर्जा प्रा. लि. कंपनी नावाचा राक्षस आणि राज्य सरकारविरोधात टेंभोडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी, नागरिक आक्रमक झाले आहेत. कालच्या आंदोलनानंतर आज दुपारी हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत उद्याच्या तीव्र आंदोलनाची बीजं पेरण्यात आली. त्यामुळे हे आंदोलन पोलिस संख्येच्या दहा पटीने करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दरम्यान, उद्या जिल्हाधिकार्यांकडे बैठक होणार नसून शिष्टमंडळाचे निवेदन ते स्वीकारणार असल्याचे त्यांच्या कार्यलयातून सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या राजस्व दालनात बैठक आयोजित केल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, प्रत्यक्षात म्हसे केवळ माजी आ. बाळाराम पाटील आणि शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकार्यांकडून न्याय हक्काच्या आशा मावळल्या आहेत.
दुसरीकडे प्रकाश म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्यांनी गाव पिंजून काढत उद्याच्या आंदोलनाची व्युहरचना आखली आहे. तसा निर्णय आजच्या वैठकीत घेण्यात आला.
बैठकीला माजी आ. बाळाराम पाटील, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते जी. आर. पाटील, जे. एम. म्हात्रे, आर. सी. घरत, बबनदादा पाटील, कांतीलाल कडू, सुदाम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाटील, हेमराज म्हात्रे, आर्किटेक्ट योगेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, सुनील म्हात्रे, संजय पाटील, योगेश पगडे, हरेश पाटील आणि महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाचा एल्गार चेतविताना स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या असहकाराविषयी चीड व्यक्त करण्यात आली.
जमिनीची नुकसान भरपाई योग्य त्या आर्थिक गणितात बसवून द्यावी किंवा शक्यतो मुंबई ऊर्जाचे टॉवर वनखात्याच्या जमिनीत उभारावे, असे धोरण ठरवून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्याचे बैठकीत ठरले आहे.