- मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयाकडे अंगुलीनिर्देश
अलिबाग/निर्भीड लेख वृत्त
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयातून मुंबई ऊर्जा टॉवर प्रकल्पाची सूत्रे हलत असल्याने मला बदल करण्याचे अथवा हस्तक्षेप करण्याचा काहीच अधिकार नाही, अशा शब्दात पनवेल तालुक्यातील मुंबई ऊर्जा टॉवर प्रकल्पबाधित शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी सपशेल असमर्थता दर्शवली.
पनवेल ग्रामीण भागातील 16 गावांची जमिन प्रकल्पात बाधित होत असल्याने शेतकर्यांमध्ये असंतोष धगधगत आहे. त्यात आंदोलन सुरु ठेवून कामही बंद पाडले होते. यासंदर्भात आज महाविकास आघाडीच्या वतीने बबन पाटील यांनी म्हसे यांना निवेदन दिले.
त्यांच्या समवेत अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील, बाळाराम पाटील, प्रकाश म्हात्रे, जे. एम. म्हात्रे, सुदाम पाटील आणि अतुल म्हात्रे उपस्थित होते.
म्हसे यांनी आंदोलकांची मागणी रास्त असली आणि विद्युत वाहिनीचा मार्ग बदलण्याचा पर्याय खुला असला तरी मला त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगत म्हसे यांनीही हात वर केले.
यानंतर नेत्यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांच्याकडे मुंबई ऊर्जा प्रकल्पाचा प्रश्न मांडण्यात येईल, असे ठरले आहे.त्यामुळे तालुक्यातील 16 गावांच्या बाधित जमिनीचा प्रश्न संभाव्य निवडणुकीत कळीचा ठरणार आहे.
निवेदनावर टेंभोडे संघर्ष समितीच्यावतीने प्रकाश म्हात्रे, विजय गडगे, भास्कर आगलावे आणि प्रशांत कडव आदींच्या साक्षरी आहेत.