चिरनेरकरांनी गाव बुडाल्याचा घेतला निवडणुकीत बदला!



चिरनेरकरांनी गाव बुडाल्याचा 

घेतला निवडणुकीत बदला!

उरण/निर्भीड लेख वृत्त

उरण तालुक्यातील जासई, दिघोडे चिरनेर या तिन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाआघाडीने भाजपला चितपट केले आहे. तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचापदासह सदस्यांचाही बहुमताचा आकडा पार करून निर्विवाद सत्ता काबीज केली आहे. 

उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत महाआघाडी विरोधात भाजप असा सामना रंगला होता.सरपंचासह 17 जागांसाठी पाच प्रभागातून 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.प्रभाग क्रमांक 4 मधून महाआघाडीच्या भारती मनोज ठाकूर या याआधीच बिनविरोध निवडून आल्याने महाआघाडीला शुभशकुन मिळाला होता. 

भाजपच्याच धनदांडग्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांमुळेच मागील काही वर्षांपासून ऐतिहासिक चिरनेर गावाला पावसाळ्यात सातत्याने पुराचा सामना करावा लागत आहे. निवडणूकीच्या प्रचारात प्रमुख मुद्दा बनला होता. याच मुद्द्यांनी भाजपची नौका मतदारांनी अरबी समुद्रात बुडविली. 

निवडणूकीच्या प्रचारात भाजपाचे आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूरांनी जाहीर सभा घेऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महाआघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार भास्कर मोकल (3128 मते) यांनी भाजपचे उमेदवार प्रतिक गोंधळी (1224 मते) यांना 1904 मतांनी पराभूत केले. तर सदस्यपदाच्या 15 पैकी 14 जागा जिंकून ग्रामपंचायतीवरही निर्विवादपणे सत्ताही काबीज केली आहे.

दिघोडे ग्रामपंचायतीत सत्ताधारी भाजप विरोधात कॉंग्रेस, शेकाप आघाडी अशीच लढत झाली. मागील निवडणुकीत ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता स्थापन केली होती. मात्र निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्‍वासनाची पुर्तता भाजपच्या सत्ताधार्‍यांनी केलेली नाही. याचाच फायदा उठवत कॉंग्रेस-शेकाप आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार किर्तीनिधी ठाकूर (1237 मते) यांनी भाजपचे मयुर घरत (793 मते) यांचा 444 मतांनी पराभव केला आहे. तर महाआघाडीचे 9 पैकी 9 सदस्य निवडून आल्याने ग्रामपंचायतीवरही महाआघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.


दिबांच्या जन्मभूमीत 

भाजपाला पराभवाची चव

लोकनेते दिवंगत दिबांचे जन्मगाव असलेल्या जासई ग्रामपंचायतींमध्ये सर्वपक्षीय इंडिया महाआघाडी विरोधात भाजप अशी सरळ लढत झाली. सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीची थेट सरपंच आणि 17 सदस्य अशी 18 जागांसाठी निवडणूक झाली. यामधून इंडिया महाआघाडीच्या सृष्टी म्हात्रे यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सरपंच व उर्वरित 16 सदस्यपदासाठी निवडणूक झाली. सर्वपक्षीय इंडिया महाआघाडीचे 17 पैकी 12 सदस्य निवडून आले आहेत. तर सरपंचपदी इंडिया महाआघाडीचे संतोष घरत (1925 मते) यांनी भाजपचे बळीराम घरत (1773 मते) यांचा 152 मतांनी पराभव केला आहे.

निवडणूकीत विजयी मिळवण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये विविध राजकीय पक्षांच्या प्रचार रॅली, सभा घरोघरी जाऊन प्रचाराचा धुरळा उडविला होता. मतदारांना विविध आमिषे दाखवून आकर्षित करण्यासाठी आटोकाट प्रयत्नही केले होते. मात्र सुजाण, सुशिक्षित मतदारांनी मतदानाचा कौल भाजप विरोधात दिला आहे.

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...