अवघ्या तीन तासात बॅनरवरून
आमदारांचा फोटो हटविला!
महापालिका आयुक्तांनी तिसरे नेत्र उघडताच गटनेतेही ‘बाद’
त्याचं असं झालं... दिवाळी पहाट आणि स्वर-सुरांच्या सांस्कृतिक फराळातून पनवेलकरांची भूक भागविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला. त्यासाठी नामीयुक्ती लढवत निविदा प्रकाशित केली. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मतानुसार चार ते पाच सामाजिक संस्था पुढे आल्या. मग झालेल्या चर्चेत महापालिका प्रशासनाने किमान 11 लाख रुपये खर्चाची अट घातल्याने इतर संस्थांनी ‘रिव्हर्स गिअर’ टाकला. आमदार प्रशांत ठाकूर अध्यक्ष असलेल्या त्यांच्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाच्या ते पथ्थ्यावर पडले. त्यांनी महापालिकेच्या सुरात सूर मिसळत हात मिळवणी केली.
शनिवारी (ता. 11) सकाळी प्रख्यात गायिका आर्या आंबेकर यांची सांगितिक मैफिल महापालिकेने आयोजित केली आहे. त्याची प्रसिद्धी करताना त्या कार्यक्रमावर वर्चस्व गाजवण्याचा ठाकूर बंधुंनी केविलवाणा प्रयत्न केला. महापालिकेचे जुजबी नाव आणि लोगो टाकून तयार करण्यात आलेल्या बॅनरवर आ. प्रशांत ठाकूर व त्यांचे बंधू परेश ठाकूर यांचे फोटो छापण्यात आले. प्रायोजक असलेल्या संस्थेने महापालिका आयुक्तांना गृहित धरून महापालिका प्रशासन आणि करदात्यांचा घोर अपमान केला.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे फोनवरून संपर्क साधत आक्षेप नोंदवताच देशमुख यांनी तिसरे नेत्र उघडून आ. प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला ‘कात्रजचा घाट’ दाखविला. त्यांनी केलेल्या आदेशानंतर अवघ्या तीन तासात प्रायोजक संस्थेच्या आमदार व गटनेत्यांच्या फोटोला बॅनरवर कात्री लावल्याने ठाकुरांना तोंड लपविण्याची पाळी आली आहे.
भाजपा सांस्कृतिक सेल आणि भक्तांनी मोठ्या आवडीने हे बॅनर त्यांच्या सोशल मीडियावर झळकावले होते. त्यांनीही माघार घेत बॅनर हटविले.त्यानंतर महापालिकेने तयार केलेल्या बॅनरवर ठाकुरांच्या संस्थेचा प्रयोजक असा उल्लेख करून एकतर्फी श्रेय लाटणार्या ठाकुरांना सणसणीत चपराक दिली आहे.
महापालिकेकडून नियमांचे उल्लंघन
सुशोभीकरण केलेल्या वडाळे तलावाचे सौदर्य राखण्यासाठी आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्याकरिता कुणीही त्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असा अध्यादेश काढला आहे. त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून ठाकूर नेहमीच ‘कोशिश’ करतात. आता तर महापालिका प्रशासनाने त्यांचेच आदेश दिवाळी पहाटमधून धाब्यावर बसवून उल्लंघन करीत असल्याची चर्चा पिकली आहे.