उरणमधील प्रकल्पग्रस्त, शेतकरी कामगारांचे सीडब्लूसीविरोधात उपोषणाचे हत्यार



कामगार देशोधडीला; नेत्यांचे हात गगनाला!

उरणमधील प्रकल्पग्रस्त, शेतकरी कामगारांचे सीडब्लूसीविरोधात उपोषणाचे हत्यार 

उरण/निर्भीड लेख वृत्त

एकीकडे दिवाळीची रोषणाई, मोठ्या आकड्यांचा बोनस, विविध वस्तूंच्या रूपात मिळणार्‍या भेटवस्तू, कामगार नेत्यांची पाचही बोटं तुपात, अगदी सोन्याचा चष्मा लावण्याइतपत मजल गेली आहे. दुसरीकडे 30 वर्षांपासून घामाच्या धारांतून सीडब्लूसी वेअरहौसिंगच्या व्यवसायाचा आलेख नफ्यात नेणार्‍या 300 कामगारांना कंपनीने देशोधडीला लावले आहेत. तरीही कामगार नेते त्यांच्या पोळीवर तूप वाढून झाल्याने मौन बाळगून आहेत. कामगारांनी न्याय हक्कासाठी कुटुंबासह 20 नोव्हेंबरपासून उपोषणाचे हत्यार उगारले आहे.

 

उरण परिसरातील पागोटे येथे असलेल्या सीडब्लूसी वेअर हौसिंग कॉर्पोरेशन कंपनीत 30 वर्षांपूर्वी कामावर रुजू झालेल्या 373 कामगारांना कंपनी प्रशासनाने तडकाफडकी कामावरून कमी केले आहेत. याशिवाय कामगारांच्या जखमेवर मीठ चोळून शंभर परप्रांतीयांची भरती करण्याचा करंटेपणा विभागीय व्यवस्थापकांनी केले असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यांनी कंपनी आणि सरकारी यंत्रणेला पाठविलेल्या पत्रातून 20 नोव्हेंबरपासून निदर्शने आणि साखळी उपोषण तर सात दिवसात प्रश्‍न मार्गी लावून कामगारांना पुन्हा कामावर न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा कामगारांनी दिला आहे.

स्थानिकांवर अन्याय होत असताना स्थानिकांच्या नोकर भरतीत दलाली करून कोट्यधीश झालेले कामगार नेते डोळ्यावर प्रशासनाच्या लाचारीचा सोन्याचा चष्मा लावून फिरत आहेत. त्यांना  अचानक आलेल्या आर्थिक सुबत्तेमधून गगनाला हात लावण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. मात्र कंपनी प्रशासन आणि बोगस कामगार नेत्यांना कामगारांचा दिवाळीत शाप लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, राजेंद्र मोहिते, तुळशीराम माळी, बाळकृष्णा कगेतर, राजेंद्र ठाकूर, सुनील घरत, अशोक भोईर, प्रकाश पाटील, संतोष ठाकूर, विजय गोंधळी, कलावंत पाटील, केसरीनाथ भगत, सुनील नाईक, राजू पाटील, विकास कडू, महादेव गावंड, मच्छिंद्र कोळी, सुभाष मोकाशी, अमित कडू, देवेंद्र ठाकूर, विनोद पाटील, दत्तात्रेय म्हात्रे, वसंत मढवी, यशवंत घरत, हिरामण ठाकूर, अजित ठाकूर, संजय ठाकूर, विश्‍वास घरत, हेमंत पाटील, वसंत पाटील, योगेश मोकाशी, महदेव घरत, अनिल ठाकूर, एकनाथ भगत, रत्नाकर पाटील, गणेश पाटील, सम्राट भगत, धर्मदास तांडेल आदी कामगारांनी न्यायहक्कासाठी कुटुंबासह 20 नोव्हेंबरपासून उपोषणाचे हत्यार उगारले आहे.


दोन लाखापासून 15 लाखात विकत घेतली होती नोकरी!

जेएनपीटी नावाच्या सोन्याची अंडी देणार्‍या शहामृगाच्या पाठीमागे नोकरीसाठी लागलेल्या कामगारांची व्यथा अत्यंत विदारक आहे. काही राजकीय पुढर्‍यांच्या वशिल्याने काही दलालांना 2 ते 15 लाखापर्यंत रोकड मोजून कामाला लागले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी अनेकांनी दागिने, जमिनी विकून पैसे मोजले आणि मिळेल ती नोकरी पदरात पाडून घेतली. यातून कामगार खंगत गेला आणि दलाल पुढार्‍यांच्या घरावर सोन्याची कौले पडत गेली. आता कामगार शाप देत असल्याने त्यांच्या सोन्याच्या लंकेला आग लागण्याची पाळी आली आहे. आता प्रश्‍न आहे तो कामगारांना न्याय मिळेल की, कंपनी प्रशासन त्यांच्यावर अन्याय सुरूच ठेवेल, हे लवकरच कळेल.

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...