भाजपाचा नागपूरात सुफडासाफ!
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
मुंबई/निर्भीड लेख वृत्त
राज्यात ग्रामपंचायत निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत टिकेचे अग्नीबाण सोडले. नागपूरच्या होमपीचवर त्यांचा सुफडासाफ केला आहे. खोटं बोलायला मर्यादा असतात, त्या ते पाळत नाहीत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जिंकलेल्या ग्रामपंचायतींची नावे घोषित करावी, मग कॉंग्रेस आकडेवारी देईल असे ठोस प्रतिआव्हानच त्यांनी दिले.
स्व. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी नाना पटोले यांना विचारलेल्या विविध प्रश्नांवर नाना मुद्देसूद बोलत होते.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना नाना म्हणाले की, महादेव घोटाळ्यात भाजपाचे हितसंबंधित गुंतले आहेत. त्यांच्या हे प्रकरण अंगलट येत असल्यानेच त्यांनी उलटा कांगावा सुरु केला आहे. ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’, अशा शब्दात भाजपावर त्यांनी याप्रकरणी आसूड ओढले.मराठा आरक्षण मुद्द्यावर कॉंग्रेसचे नेते आणि राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वाडेट्टीवार यांची भूमिका सारखी बदलत राहते, असा अडचणीचा प्रश्न त्यांना विचारला असता, ते म्हणाले असतील तर ती त्यांची अभिव्यक्ती असू शकेल. कॉंग्रेसची भूमिका आमचे नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केली आहे. मराठ्यांना आरक्षण दिले गेले पाहिजे. सरकारनेही सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत कबूल केले आहे की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे. कॉंग्रेसचीही ती भूमिका आहे. देशात ओबीसींची संख्या 56 टक्के आहे. मराठ्यांना आरक्षण टिकणारे दिले पाहिजे पण राज्य सरकारची मानसिकता दिसत नसल्याचा हल्लाबोल नाना पटोले यांनी चढविला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिवाळीच्या शुभेच्छा कोणत्या पद्धतीत द्याल, असा खट्याळ प्रश्न विचारताच, गालातल्या गालात हसून नानांनी अतिशय मिश्किल उत्तर दिले. ते म्हणाले, देशातील महागाईने जनता मेटकुटीस आली आहे. काहींच्या घरातील चुली विझल्या आहेत. सरकार शेतकर्यांची क्रूरचेष्टा करीत आहे. ते सारे प्रश्न सोडवून महागाई कमी करावी, अशा शुभेच्छा देत असल्याचे सांगत त्यांनी कसलेल्या मल्लासारखी धोबीपछाड दिली.
मुंबईतील वाढते प्रदूषण आणि त्यावर उच्च न्यायालयाची नाराजी यावर इंग्रजी माध्यमाच्या प्रतिनिधीने छेडले असता, मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला कॉंक्रिटचे जंगल आणि इमारतींचे जाळे कारणीभूत आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि त्यापाठी राज्य शासनाचे अदृश्य असलेले हात जबाबदार असल्याचा आरोप करून नाना पटोले यांनी सरकारला खिंडीत पकडले.
यावेळी नानाभाऊंसोबत रायगड जिल्हा कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल कडू, मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष मदनशेठ उपस्थित होते.
वस्तुस्थिती भाजपाने मांडली पाहिजे!
जळता महाराष्ट्र नको, हा शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. पण इथं ड्रग्स माफियाचं साम्राज्य निर्माण करून ठेवलं आहे. ड्रग्समध्ये नव्या पिढीला टाकलं जात आहे. ड्रग्समुक्त महाराष्ट्र पाहिजे. या राज्यात रोजगार निर्मिती झाली पाहिजे. जे उद्योग तुम्ही गुजरातला नेले आणि तरीही महाराष्ट्रच नंबर वन आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, पण वस्तुस्थिती भाजपाने मांडली पाहिजे ही भूमिका कॉंग्रेस पक्षाची आहे. काही मंत्र्यांना डेंग्यु झालेला आहे, कोण कुठे काय करतंय, हे राज्याला काही कळायला मार्ग नाही. म्हणून भाजपाने सर्व वस्तुस्थिती मांडली पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले.