पानसरेंनी ‘विवेक’ जपला!

पानसरेंनी ‘विवेक’ जपला!

विशेष संपादकीय

- कांतीलाल कडू

थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल मीडिया फेम कुविख्यात टोळीप्रमुख राहुल पाटील याला पनवेल पोलिसांनी अखेर ‘खाक्या’ दाखवत त्याच्या घरातून उचलून आणले. 

ओवळे येथे बैलगाडा शर्यतीत पराभव झाल्यानंतर हवेत गोळीबार करून सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविणे, गैर कायद्याचा जमाव जमवून दगडफेकीतून सामाजिक अशांतता निर्माण करणे, हल्ला घडवून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणे आदी त्याच्याविरोधात गंभीर गुन्हे आहेत. ही त्याची पहिली वेळ आहे, असेही नाही.

यापूर्वी दिवंगत पंढरीनाथ फडके यांच्यावर गोळीबार केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी तेथील पोलिसांनी राहुल पाटीलवर काहीच कारवाई केली नाही. पुढे कल्याणमध्ये जमिनीवरून झालेल्या राड्यात चक्क पोलिस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी राहुल पाटील आणि साथीदारांवर गोळीबार केला. त्यात तो सुदैवाने वाचला. तरीही त्याची गुंडगिरीची खुमखुमी कमी झाली नाही. नाही म्हणायला ते सुद्धा त्या-त्या पोलिस ठाण्याचे अपयश मानावे लागेल. 

ठाणे, कल्याण, भिवंडी भागात हैदोस माजविणार्‍या मंचेकर टोळीतील 49 जणांचा चकमकीत खात्मा केल्याचा रेकॉर्ड महाराष्ट्र पोलिसांच्या नावावर आहे. त्यांच्यापुढे राहुल हा किरकोळ गुंड आहे. जेव्हा मुंबई, महाराष्ट्रात गुन्हेगारी टोळ्या डोके वर काढतात किंवा त्या पोसल्या जातात, तेव्हा त्यांना निश्‍चितच राज्य आणि केंद्रातील सत्ताधार्‍यांचे अभय असते. हे सध्याच्या सरकारच्या बाबतीत घडते असे नाही. कॉंग्रेसच्या किंवा बिगर कॉंग्रेसच्या बाबतीतही तेच घडते. अगदी गुन्हेगारीवर बोलायचे तर त्याचे एक स्वतंत्र दालन भरेल, इतकी पुस्तके त्यावर प्रकाशित झाली आहेत. 

मुंबईत जेव्हा दाऊद इब्राहिम, छोटा राजन यांनी राजकीय पक्षातील नेत्यांना लक्ष्य केले होते, त्यांचे मुडदे पाडले जात होते, तेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामनामध्ये ‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’ (अरुण गवळी) अशा आशयाचे संपादकीय लिहिले होते. यातून टोळ्यांचे राजकीय समर्थन आणि उदात्तीकरण दिसते, इतकेच स्पष्ट करायचे होते. 

याची दुसरी बाजू अशीही आहे की, पोलिसांनी ठरवले की, ‘गुन्हेगारीचा बिमोड करायचा तर ते त्यांना अशक्य नाही’. तिसरी अधोरेखित बाजू अशीही आहे की, कुणाच्या तरी राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल करून एखाद्या व्यक्तीचे सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करायचे. हे चक्र पोलिस खात्याला कधी चुकले नाही. कधी कधी मग पोलिस अधिकार्‍यांचाही ‘करेक्ट कार्यक्रम’ झालेला आहे. कर्मगती कुणाला चुकली नाही, चुकत नाही, चुकूच शकत नाही.

याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खाकेत सुरक्षित असल्यागत राहुल पाटील याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यात हैदोस माजविला आहे. त्याला आभाळ दोन बोटं उरल्यागत तो बेधुंद होवून वागत होता. राज्याचे पोलिस दल त्याच्या पलंगाखाली ओलिस ठेवाल्यागत तो धुडगूस घालत होता. त्याचे पंख छाटण्याचे धाडस पनवेल शहर पोलिस, उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली केले. त्यामुळे पनवेल परिमंडळ 2 मधील पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. 

विवेक पानसरे हे जितके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत, तितकेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. मध्यंतरी पानसरे यांच्या परिमंडळ 1 मधून (वाशी, नवी मुंबई विभाग) बदलीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. तेव्हा शंभूराज देसाई, दीपक केसरकर या दोन मंत्र्यांनी ‘पत्रबॉम्ब’ पाठवून पानसरे यांची पाठराखण केली आणि त्यांच्या विरोधकांसह बदलीला ‘ब्रेक’ लावला होता. 

पनवेलचा पदभार स्विकारल्यानंतर मुंबई ऊर्जा प्रकरणात स्थानिक आमदारांना जे जमले नाही, ते पानसरे यांनी करून 24 तासात फडणवीस यांच्यासोबत बैठक घेवून आंदोलनास स्थगिती मिळवली. आताही गेल्या आठवड्यात फडणवीस पनवेलला येवून मोठा ‘पुरावा’ ठेवून गेलेत, त्याचेही श्रेय अर्थातच पानसरे यांच्याकडे जाते. त्यांचे सहकारी सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांनी यापूर्वी पनवेल हाताळले आहे. त्यांचाही दांडगा अनुभव आहे. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे हे गुन्हे प्रकटीकरणात तरबेज आहेत. शिवाय ते गाजलेले दिवंगत पोलिस अधिकारी वसंत वाघ यांचे सख्खे जावई आहेत. 

पूर्वी वसंत वाघ म्हटले की, गुन्हेगार आणि राजकीय नेत्यांची बोबडी वळायची. त्यामुळे ठाकरे यांच्यावर सासरेबुवांची कीर्ती वाढवण्याबरोबर पोलिस दलाला अधिक शुचिर्भूत करण्यावर भर द्यावा लागणार आहे. वाघ कधीच राजकीय नेत्यांच्या ओंजळीने पाणी प्याले नाहीत. त्यांच्या अडोश्यालाही लपून राहिले नाहीत. ‘तुमच्या आईचा नवरा जिवंत आहे’, असे सांगून पोलिस दलाला ते प्रोत्साहित करीत होते. तसे ठाकरेही खमके आहेत. त्यांचा कारभार राहुल पाटलांच्या अटकेनंतर तेजाळून निघणार आहे. यामध्ये श्रेय अर्थातच विवेक पानसरे यांना जाते. तसेच ते ‘लोकमत 18 न्यूज’ चॅनेलचे पत्रकार प्रमोद पाटील यांनाही जाते. त्यांनी काल पुन्हा विशेष बातमीपत्र तयार केले, त्याचाही हा परिणाम आहे. तेव्हा पानसरे यांनी ‘विवेक’ जपला. अशोकवनात दुःख, शोक करायची बैलगाडा मालकांना साधी संधीही राजपुतांनी दिली नाही. तर नितीनरावांनी ओरिजनल ‘ठाकरे शैली’ दाखवून राहुल पाटलाला अशी पराणी टोचली की, आता अनेकांचा ऊतमात निघून जाईल.

या सगळ्या प्रकरणातून बडेे राजकीय गुंड, भुमाफियांनी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या पदराखाली लपून जे उद्योग सुरु ठेवले आहेत, त्यांनाही मोठा सामाजिक इशारा मिळेल. योग्य ठिकाणी बाण लागलेला आहे, त्याची जाणीव समाजद्रोहींना होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. 

काही जण ‘सुपात’ आहेत, त्यांनाही पानसरे आणि त्यांची टीम जात्यात ओढतील, याची नियती व्यवस्था नक्कीच करेल. तोपर्यंत विवेकरावांनी उरण तालुक्यातील वेश्‍वी गावात 31 जानेवारीला गोळीबार झाला, त्याचा गुन्हा तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश निकम यांना दाखल करायला लावून जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यास प्रवृत्त करावे, म्हणजे न्याय प्रस्थापित होईल. त्या गोळीबारात एक महिला जखमी झाली आहे, ते प्रकरण दडपले गेले आहे. 

वास्तविक, गोळीबार झाल्यानंतर पोलिस तिकडे पोहचले होते. पण तिकडे दुसर्‍या गुन्ह्यामुळे वेगळे वळण लागले आणि राजकीय नेत्यांनी फायदा उचलत शांत रसाच्या सतिशरावांना गुंडाळले. मात्र ‘कोंबडं कितीही झाकले तरी तांबडं फुटायचं राहत नाही’. जसं आज राहुल पाटील याची अटक झाली, तसाच वेश्‍वी प्रकरणात पानसरे यांनी ‘विवेक’ जपावा, इतकंच सांगावंसं वाटतं.

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...