वैचारिक वारसा लोप पावला!
- कांतीलाल कडू
अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच्या विकास पर्वाचे शिल्पकार प्रभाकर पाटील यांची कन्या आणि थोडी ओळख जरा वेगळी परंतु, ती टाळता येण्यासारखी नसल्याने तो उल्लेख आदरानेच करावा लागेल, ते म्हणजे कॉंग्रेसचे कट्टर नेते प्रा. जयदास पाटील यांच्या पत्नी मीनाक्षीताई पाटील ऊर्फ बेबीताई यांची आज प्राणज्योत मालवली. ही नात्यांची अफलातून श्रृंखला त्यांच्या जीवनात काटे आणि फुलांचा गालिचा पसरत गेला तो अखेरपर्यंत. म्हणूनच काही उल्लेख टाळता येण्यासारखे नव्हते, असे म्हणावे लागते. यापेक्षा वेगळं क्षितिज त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केले, त्याचे हे अधिष्ठान होते. लढाईचे सुदर्शन चक्र त्यांच्या हाती होते, ही तीन नाती म्हणजे त्या चक्राचे भक्कम कडे होते, त्यामुळे त्या नात्यांचा ओलावा त्यांच्याभोवती कायम राहिला. ही त्यांची भावनिक पण भक्कम बाजू राहिली आहे.
महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे तारणहार समजले जाणारे विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात मीनाक्षीताई पाटील यांच्याकडे बंदर विकास खात्यापासून अनेक प्रकारची खाती होती. शेकाप आणि कॉंग्रेस म्हणजे सद्य: स्थितीत वर्णन करायचे तर ईडी आणि विरोधक. शेकाप ईडीच्या भूमिकेत होता. राज्यभर त्यांचा दरारा होता. राज्याच्या राजकारणात वैचारिक दबदबा होता. विरोधी पक्ष असताना सक्षमपणे कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांना धोबीपछाड देत. कॉंग्रेस आणि शेकाप यांचे रायगडात साप मुंगसाचे नाते राहिले आहे. दगडापासून, तलवारीपर्यंत, कोयत्यापासून कुर्हाडीपर्यंत आणि पोकळ बांबूंपासून ते भाले, बरची अशी टोकदार, धारदार हत्यारांनी दोन्ही पक्षाचे नेते आणि काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या घरी भात साठवण्यासाठी असलेली कणगी भरून ठेवली जात होती आणि निवडणुकीत ‘बिहार पॅटर्न’ला लाजवेल असे रक्तरंजित हल्ले, प्रतिहल्ले घडवून आणले जात होते. इतकी पराकोटीची दुश्मनी दोन्ही पक्षात होती. आज त्याचे मैत्रीत झालेले रूपांतर फक्त मतांच्या स्वार्थी पेटीतील राजकारण आहे. त्याला काहीही अर्थ नाही, आहे तो फक्त बागुलबुवा!
तर मीनाक्षीताई पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग-उरणच्या तीन वेळा आमदार होत्या. जिल्हा बँकेच्या संचालिका राहिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सदस्या ते मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षाही होत्या. राज्यात विलासराव देशमुख यांच्या राज्याभिषेकासाठी मॅजिक आकडा जुळवता येत नसल्याने शेकापने ती संधी साधली आणि पहिल्यांदा सुनील तटकरे यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यास प्रखर विरोध केला. शेकापचे जयंत पाटील यांनी तटकरेंना तेव्हा केलेला विरोध म्हणजे आता शिवतरे यांनी डमरु वाजवत अजितदादा पवार यांच्याविरोधात राळ उठवली होती, तसा काहीसा प्रकार होता. साधारण एकविसाव्या दिवशी विलासरावांनी जयंत पाटलांना गुंडाळले. जसे देवेंद्र फडणवीस यांनी शिवतरे आणि महादेव जानकर यांचा पोपट केला, अगदी त्याच धर्तीवर...!
मीनाक्षीताई पाटील, ज्येष्ठ नेते आबा ऊर्फ गणपतराव देशमुख आणि पेणचे मोहनभाई पाटील हे तीन शेकापचे मोहरे पहिल्यांदा कॉंग्रेसच्या ओंजळीने पाणी पित मंत्रिमंडळात सहभागी झाले होते. नाही म्हणायला शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्यावर केलेल्या खंजीर प्रयोगात शेकाप सहभागी होताच. शेकापचे दिवंगत नेते प्रा. एन. डी. पाटील पवारांच्या पुलोदमध्ये सहकार मंत्री राहिले होते. थोडक्यात काय तर नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटील यांनी ज्या कॉंग्रेसला डोळ्यासमोर धरले नाही, त्याच कॉंग्रेसने शेकाप वेळोवेळी जिवंत ठेवला आणि कॉंग्रेस मात्र ‘मरणपंथी’ लागली. ही शोकांतिका म्हणण्यापेक्षा कॉंग्रेस नेत्यांच्या लाचारीचा सर्वात मोठा ‘विषप्रयोग’ रायगडाला भोवला.
मीनाक्षीताई पाटील यांचे राजकीय कर्तृत्व हे डाव्या विचारसरणीचे असले तरी त्यांनी कधीच कुणाला दंश केला नाही. हयातभर ती पेटलेली पणती इतरांना प्रकाशाच्या मार्गावर नेताना स्वतःला चटके देत आज अखेर निमाली. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील ऐकलेपणा त्यांनी कधीच डोळ्यांच्या कडांतून वाहू दिला नाही. संघर्ष, लढाई, वैचारिक हल्ले परतवून लावताना त्यांनी कधीच हातचे राखले नाही आणि उगीच कुणावर कधीही रोष, सूड उगारला नाही. बेरजेचे राजकारण करताना त्यांनी अनेकदा शेकाप नेत्यांच्या चावडीपेक्षा कॉंग्रेस नेत्यांच्या घरचा चहा, मासळी भाकरी पसंत केली आणि त्यातून राजकीय वैर मिटवण्याचे संकेत दिले. शेकाप, कॉंग्रेस म्हणजे ‘स्पृश्य अस्पृश्यते’ची ‘लक्ष्मण रेषा’ होती. भयानक, अतिभयानक, ज्याचे वर्णन करताना भय रसाचा समुद्रसुद्धा रोडावून जाईल... इतकी भयानता होती दोन्ही पक्षात. तेव्हा ताई समतेचे, बंधुत्वतेचे, मायेचे आणि आपुलकीच्या राजकारणातून समाजकारण करीत होत्या.
मीनाक्षीताई, राजकारणात येण्यापूर्वी प्रभाकर पाटील यांच्या सावलीत पत्रकारितेचे धडे गिरवत होत्या. 1977 ते 1995 पर्यंत त्या रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. त्यांच्याच काळात रायगड जिल्हा पत्रकार भवनाची इमारत उभी राहिली आहे. तेव्हा राज्यात मोजक्या चार ते पाच पत्रकार भवनाच्या इमारती उभ्या राहिल्या होत्या. मीनाक्षीताईंच्या नेतृत्वाखाली रायगडचा स्वाभिमान जपला गेला आणि पत्रकारांना हक्काचे छप्पर मिळाले. खरं तर मीनाक्षीताईंसोबत कॉंग्रेस विचारसरणीचे पत्रकारही राजाभाऊ देसाई, नारायण मेंगडे, दा. कृ. वैरागी आणि त्यांचे बंधू यांच्याशी त्यांचे उत्तम राजकीय, सामाजिक संबंध राहिले होते.
बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांनी जाचक प्रेस बिल आणले, त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटले. राज्यभर निषेधाचे मोर्चे निघाले. त्यात सोलापूर येथे झालेल्या आंदोलनात मीनाक्षीताई सहभागी झाल्या होत्या. त्यात त्यांची धरपकड करण्यात आली. पुढे औरंगाबाद येथील कडसूळ कारागृहात पंधरा दिवसांचा त्यांना कारावास भोगावा लागला होता. बेळगाव सीमा वाद प्रकरणात पत्रकारांनी केलेल्या आंदोलनास मुंबईत पोलिसांचे कडे भेदून जाणारी रणरागिणी म्हणजे मीनाक्षीताई पाटील होत्या. तर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1984 साली झालेल्या आंदोलनात सुलभाकाकू (ताईंची आई) सोडल्या तर पेझारीचे अख्खं पाटील कुटुंबं सहभागी झाले होते. 1998 मध्ये उरणातील बीपीसीएलवर काढलेल्या मोर्चात आकाशातून वीज तुटून पडावी, तशा ताई कंपनीविरोधात आग ओकून स्थानिकांमध्ये चैतन्य पेरत होत्या.
राज्याच्या पवित्र विधानसभेत पहिल्यांदा निवडून मनसेच्या तेरा आमदारांनी ज्येष्ठ सदस्य अबू आझमी यांच्यावर जो हल्ला केला, त्यावेळी मीनाक्षीताई पाटील एकट्या वाघिणीसारख्या आझमींच्या मदतीला धावल्या नसत्या तर सभागृहाच्या भिंती रक्ताने न्हावून निघाल्या असत्या. इतक्या प्रेमळ, धाडसी आणि तितक्याच कठोरतेने प्रहार करत त्या सरकारवर तुटून पडत असत. सभागृहात वैचारिक मुद्दे मांडताना इतर पक्षाचे आमदार नेहमीच हाताची घडी घालून त्यांना ऐकत असत. सभागृह आणि बाहेरील त्यांची भाषणे यात कधीच तफावत राहिली नाही. जे पोटात ते ओठावर अशी त्यांची ओळख राहिली आहे. अलीकडे त्यांचा एका आजाराने पाठलाग केला. त्यावर उत्तम उपचार झाले होते. त्या कधी अलिबाग तर कधी नवी मुंबईत वास्तव्याला होत्या. चिरंजीव आस्वाद पाटील यांनी त्यांना फुलासारखे जपले. पण विश्वनियंत्याने आस्वाद पाटलांना आज पोरके करून त्यांचे मायेचे आभाळ हिरावून घेतले. राज्यातील रणरागिणीला कायमची विश्रांती मिळाली. त्यांच्या आठवणींचा झुंबर शेकाप आणि कष्टकरी, वंचितांच्या मनात कायमच प्रज्वलित राहिल यात वाद नाही.