अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये!

अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले

पनवेल/निर्भीड लेख वृत्त

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यावरून केंद्र आणि राज्य सरकारचे मानसिक संतुलन बिघडल्याची स्थिती आहे. त्यात नाव देण्याच्या धरसोड वृत्तीने स्थानिक, प्रकल्पग्रस्त तसेच अठरा पगड जातीच्या दिबाप्रेमींमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी असताना दिबांचे चिरंजीव अतुल पाटील यांनी सुपारी वाजवून मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना एकतर्फी पाठिंबा देण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याने बारणे यांच्यासाठी मोठा धोका ठरणार आहे.

पनवेल, उरण आगरी समाज परिषदेचे अपघाती अध्यक्ष असलेले अतुल पाटील यांनी समाज, कृती समितीला विश्‍वासात न घेता कुठल्या तरी शेठजीच्या इशार्‍यावर अतुल पाटलांनी शेपूट हलवून थेट बारणे यांना एकतर्फी पाठिंबा दिल्याने आगरी समाजासह अठरा पगड जातींचा त्यांनी विश्‍वासघात केल्याचा घणाघात पाटील यांनी करून येत्या दोन-तीन दिवसात पत्रकार परिषद घेवून यावर संघटनेची स्पष्ट भूमिका घोषित करणार असल्याचे दै. निर्भीड लेखशी बोलताना सांगितले.

पाटील अत्यंत रोषपूर्वक म्हणाले की, अतुल हे दि. बा. पाटील यांचे पुत्र असले तरी दिबांच्या कोणत्याही आंदोलनात त्यांचे योगदान राहिलेले नाही. शिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यावरून स्थानिक, प्रकल्पग्रस्त आणि पनवेल, उरण, बेलापूर, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, भिवंडी, कल्याण विधानसभा मतदार संघातील लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्या भावना अतुल पाटील यांनी पायदळी तुडवून घेण्यासाठी राजकीय भाटांची सुपारी घेवू नये, असा इशारा दशरथ पाटील यांनी दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मावळचे उमदेवार श्रीरंग बारणे चांगलेच अडचणीत आले आहेत.

दशरथ पाटील पुढे म्हणाले की, येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र व राज्य सरकारने दिबा पाटील यांच्या नावाची अधिसूचना जाहीर केली नाही तर 24 जूनपासून उग्र आंदोलनास प्रारंभ केला जाईल. त्यामुळे अतुल पाटलांनी उगीच शेठजीची सुपारी घेवून आगरी समाजाशी द्रोह करू नये. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समिती वेळ पडल्यास तटस्थ राहण्याचा निर्णय घेईल. मात्र, कुणाच्या वळचणीला एकतर्फी जाणार नाही, असा इशारा देवून समाजाच्या विविध पदाधिकार्‍यांसोबत त्यांनी चर्चा करून अतुल पाटलांच्या विकावू भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा नाहक फटका आता श्रीरंग बारणे यांना बसणार असल्याचे दिसते.


समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न 

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यावरून केंद्र व राज्य सरकारने टाळाटाळ सुरु ठेवली आहे. आगरी समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रयत्न आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौर्‍यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम विमानतळाच्या जागेवर झाला. त्यावेळी अतुल पाटील यांच्या कपाळी मुंडावळ्या बांधून भाजपा नेत्यांनी प्रेषकांच्या गर्दीत बसविले होते. परंतु, मोदी यांनी लोकनेते दिबा पाटलांच्या नावाला बगल दिल्याने रायगड, मावळ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर, पुणे परिसरात प्रचंड नाराजी पसरली आहे. हा केवळ दिबा पाटील यांचा अवमान नसून महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकर्‍यांचा अपमान आहे. त्याचे पडसाद मतपेटीतून उमटतील, अशी अपेक्षा आहे. शिवाय आता जो काही डोंबार्‍याचा खेळ सुरु आहे, त्यातून आगरी समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न आहे.

- सुप्रिया पाटील, (राजकीय विश्‍लेषक)


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...