‘ही’ तर लोकनेते दि. बा.
पाटलांची वैचारिक हत्या!
- कांतीलाल कडू
विशेष संपादकीय
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली. त्यांच्या मते तो ‘वध’ होता. हत्या म्हणण्याचे धाडस आणि सत्याची छाती त्यांच्याकडे नसल्याने बदला घेतला, सूड उगारला असा बुद्धिभेद करून सहानुभूती मिळवण्याचे विकृत चाळे आजही सुरूच आहेत. त्यात आता लोकनेते, शेतकर्यांचे कैवारी दि. बा. पाटील यांच्या ‘विचारांची हत्या’ सुद्धा याच वर्गाने केली आहे. त्याच्या मते हवे तर तो ही ‘वध’ ठरावा, अशी त्यामागे त्यांची अंतरिक भावना नक्कीच असणार आहे.
खारघर येथे मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारासाठी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय सभा काही भुमाफियांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी म्हणे, नवी मुंबईतून विमान उडेल तेव्हा ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे’, अशी उद्घोषणा होईल. ही पुडी देवेंद्र फडणवीस यांनी सोडली तेव्हा व्यासपीठावर आणि समोर बसलेल्या ‘देवेंद्र भक्तांना’ त्यांनी ‘ठार वेडे’ ठरवून टाकले. देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले असे म्हणायला हरकत नाही. मुळात देवेंद्र फडणवीस नेहमी जातीचा उल्लेख करतात म्हणून संदर्भासाठी सांगावंस वाटते की, ‘ब्राह्मण सत्यवचनी असावा. औषधालाही त्याला खोटं बोलण्याचा अधिकार नाही’. इथं मात्र, देवेंद्र फडणवीस म्हणजे दुर्गुणांनी ओतप्रोत भरले आहेत. त्यातही खोटं बोलण्यात नखशिखांत बुडाले आहेत. ते पावलोपावली खोटं बोलतात हे गेल्या नऊ वर्षात महाराष्ट्राने अनुभवले आहे. नागरिकांना त्याची प्रचिती आलीच आहे.
अगदी तीन-चार महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची सभा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली. तेव्हा दि. बां. च्या नावाचा मोदीजींनी ‘परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी’, यापैकी कोणत्याही वाणीतून उच्चार केला नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या ‘कीर्तीचा तेजाब’ मोदीजी आणि त्यांच्या संघ परिवाराला मान्यच करायचे नाही. मुंबईतून हुतात्म्यांच्या भूमीत आलेल्या राष्ट्रीय उड्डाणपुलाही, सेतूला त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव दिले. वास्तविक, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सोबतीने देशस्तरावर काम करणार्या अनेक विभूती महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यात कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रेहमान अंतुले होते. परंतु, ते जातीने मुसलमान, ही मोदीजींना अडचण ठरली असेल. त्याहीपेक्षा मुंबई हल्ल्यातील कसाब ऑपरेशनवर अंतुले यांनी लोकसभेच्या सभागृहात आरएसएसला लक्ष्य केले होते. दुर्दैवाची बाब म्हणजे तेव्हा अंतुले यांना वेड्यात काढले होते. निवृत्त पोलिस महासंचालक एस. एम. मुश्रीफ यांनी त्यांच्या ‘व्हू किल्ड करकरे’ या पुस्तकात प्रश्नांकित वादळ पेरले आहे. करकरे यांच्या शरीरात शिरलेल्या गोळ्यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट काही भलतंच सांगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तोच आरोप आज, मुंबईतील भाजपाचे उमेदवार ऍॅड. उज्ज्वल निकम यांच्यावर उलटत आहे.
दुसरे असे की, मधू दंडवते हे कोकण रेल्वेचे जनक मानले जातात. त्यांचे नावही अटल सेतूला संयुक्तिक ठरले असते. याशिवाय कामगारांचे जीवश्य: कंठश्य प्रामाणिक कामगार नेते, ‘बंद सम्राट’ जॉर्ज फर्नांडिस यांचेही नाव दिले असते तर काही गैर ठरले नसते. कोकणात अनेक राष्ट्रीयस्तरावर नाव कमाविलेले विविध क्षेत्रातील दिग्गज आहेत. त्यांना टाळून अटलजी बिहारींना स्थानिक, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या छाताड्यावर बसविले. ही भाजपाची खेळी आहे. भविष्यात इथल्या विमानतळाला माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा याचा नातू ‘सेक्स कँडल फेम’ रेवण्णा देवेगौडा किंवा महाराष्ट्रात ज्यांनी भाजपाच्या फडाचा डफ वाजवून ईडीच्या नावाने नंगानाच केला, त्या किरीट सोमय्यांचेसुद्धा नाव दिले जावू शकते. कुणीही फार भ्रमात राहू नये. मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात एक आणि ओठात एक आहे. आम्ही काही दिवसांपूर्वीच, ‘अतुल पाटलांनी (दिबांचे चिरंजीव आणि वैचारिक मारेकरी) बारणेंची सुपारी घेवू नये’, हे वृत्त प्रकाशित केल्यापासून स्थानिकांच्या स्वाभिमानाचा ‘लाव्हारस’ धगधगत आहे. मतपेटीत त्याचा विस्फोट होण्याच्या भीतीने फडणवीस यांनी या मुद्द्याला स्पर्श केला, इतकंच त्यामागील इंगीत आहे. विमानतळाला विरोध होता. 14 गावे विस्थापित होणार या भीतीने त्यांनी मतपेटीतून रोष व्यक्त केला आणि शेकापच्या विवेक पाटलांना उरण मतदार संघातून धुळीस मिळविले. हा इतिहास ताजा आहे. त्याची पुर्नरावृत्ती होण्याची शक्यता लक्षात घेवून फडणवीस यांनी मधाचे बोट पुन्हा स्थानिकांच्या ओठाला टेकले आहे. बस्स इतकंच! बहुजन समाजाला नागवून पुन्हा एकदा पेशवाईचे राज्य आणायचे आहे. त्यासाठी खांदेही आपले आणि शिकारसुद्धा आपलीच केली जाते, याचे भान दुर्दैवाने आपल्याच लोकांना राहिले नाही.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ, होत असलेला विलंब यातून हे स्पष्ट होत आहे दिबांच्या नावाला न्याय द्यायचा नाही. मात्र, मावळ लोकसभा आणि ऑक्टोबरमध्ये येणार्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सपशेल पराभव दिसू लागल्याने देवेंद्र फडणवीस यांनी नैराश्यातून दि. बा. च्या उद्घोषणेचे ‘लॉलीपॉप’ दाखवून ‘सामूहिक संमोहन’, करण्यात बाजी मारली आहे. पण, त्याचे बुमरँग भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांवर निश्चित दोन्ही निवडणुकीत उलटणार आहे.
उद्धव ठाकरे यांचे राज्यात सरकार असताना भाजपाने फूस लावून लोकांना लाखोंचे आंदोलन करायला भाग पाडले. लोकांनी दिबांवरील प्रेम, आत्मियता, श्रद्धा, निष्ठेचे पाईक होवून आंदोलने छेडली. यात फडणवीस, ‘ठाकरे सरकार’ अस्थिर करण्यात यशस्वी जरी झाले नसले तरी तत्कालीन सरकारविरोधात लोकांच्या मनात दिबांच्या नावाला विरोध केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे आणि त्यांचे तत्कालीन सहकारी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात चीड निर्माण करण्यात देवेंद्रजी यशस्वी झाले. नियतीने हा ‘गेम’ आता त्यांच्यावर उलटवला आहे. ‘आता बोला, नावाची अधिसूचना कधी करता?’, असा एकच निर्धार जनतेने, दिबाप्रेमींनी मनाशी केला आहे. नावाची उद्घोषणा होईल तेव्हा होईल. पण केंद्र सरकारने हे प्रकरण दाबून ठेवले आहे. हे षडयंत्र आहे. ते इतक्या लवकर लक्षात येणार नाही. जेव्हा येईल तेव्हा फारच उशीर झालेला असेल आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही. असेही त्यांनी रायगड आणि नाशिकमधून आगरी उमेदवार हद्दपार केले आहेत.
आपले नेतृत्व नसेल तर व्यथा कोण मांडणार? भुमाफिया, चोरांची त्यांच्यापुढे अजिबात डाळ शिजत नाही. एकूणच ही विमानतळाच्या नामकरणाची लोणकढी सोडली असेल तरीही लोकनेते दिबांच्या वैचारिकतेची ही हत्या आहे. त्यांच्या संघर्षमय लढ्याचा हा अंत ठरवत आहेत. एकूणच मधाची धार सत्तेच्या तलवारीवर ओतून दिबा आणि आगरी समाज, अठरा पगड जाती, बारा बलुतेदार अगदीच ‘बहुजन समाजाचा वध’ केला आहे. नाही! ही तर ठरवून केलेली त्यांच्या विचारांची हत्या आहे.