विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या 

‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

 कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका 

पनवेल/निर्भीड लेख वृत्त

गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळत असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यातील अन्य दोन माजी संचालकांना आज सीआयडीच्या पोलिस उपअधीक्षकांनी चाप लावला. खारघर आणि खारपाडा येथून दोघांना ताब्यात घेतले. दोघेही मुख्य आरोपी विवेकानंद पाटील यांचे निकटवर्तीय आहेत.

भालचंद्र ऊर्फ भाई तांबोळी (मूळ गाव वेश्‍वी, सध्या रा. पनवेल) आणि डॉ. अरिफ दाखवे (रा. बारापाडा, पनवेल) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही माजी संचालकांची नावे आहेत. सीआयडीच्या उपअधिक्षिका मीना जगताप यांनी बर्‍याच कालावधी नंतर अटेकचा पाश आवळला असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात मशगुल झालेले कर्नाळा बँकेचे अनेक माजी संचालक सकाळपासून धुम ठोकून मिळेल त्या दिशेने पळत सुटले आहेत.

कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सीआयडीने अटकेची कारवाई केलेल्या आरोपींची संख्या आता चार वर गेली आहे. मुख्य आरोपी विवेकानंद पाटील हे ईडीच्या अखत्यारितीत तळोजा कारागृहाच्या कोठडीत आहेत. तर बँकचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक हेमंत सुताणे तळोजा कारागृहात आहेत. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा वडके कल्याण महिला कारागृहात आहेत.

शेकापच्या कार्यालयापासून महत्वाच्या बैठका ते आंदोलनात वडापाव ते बिर्याणीपर्यंत आणि आर्थिक सेवा पुरवण्यात भालचंद्र तांबोळी गेल्या चार दशकापासून विवेकानंद पाटलांसोबत अग्रेसर होते. याशिवाय ‘पाटलांचा वाडा आणि माडी’ सजविण्यात डॉ. अरिफ दाखवे वाक्बगार होते. जमिनीच्या व्यवहारांचेही ते साक्षीदार आहेत. पाटलांना हवं, नको ते पुरवणार्‍यांच्या यादीत हे दोन्ही चेहरे आघाडीवर राहिल्याने त्यांना कर्नाळा बँकेच्या संचालक पदाची वतनदारी बहाल केली होती. त्यांचा नवा प्रवास आजपासून कारागृहाच्या कोठडीच्या दिशेने सुरु होण्याची शक्यता आहे. 

महाविकास आघाडीचे नेते छाती ताणून लोकसभा निवडणुकीत उतरले होते. त्यात कर्नाळा बँकेचे माजी संचालकही सहभागी झाले होते. सीआयडीने अलगद चाप ओढल्याने दोन शिकारीच सीआयडीच्या जाळ्यात अडकले आहेत. बाकीचे घर सोडून पुन्हा पळून गेले आहेत.

पाटलांच्या जामीनासाठी अर्ज दाखल 

उच्च न्यायालयात कर्नाळा बँकेचे मुख्य आरोपी विवेकानंद पाटील यांच्या जामीनासाठी अर्ज दाखल असताना आज, बुधवारी (ता. 15) पनवेल येथील न्या. पालदेवार यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पाटील यांच्या वकिलांनी यापूर्वी एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल होत नसल्याने तो रद्द करावा, अशी मागणी करणारे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यावर आज सुनावणी झाली. ते प्रतिज्ञापत्र मागे घेण्याची तयारीही वकिलांनी दर्शविली. याशिवाय आज विवेकानंद पाटलांच्या जामीनासाठी अर्ज केला आहे. पहिला जामीन अर्ज ईडीच्या उच्च न्यायालयात केलेला आहे.


उद्या करणार आरोपींना न्यायालयात हजर 

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणातील सीआयडी पथकाने आज ताब्यात घेतलेल्या भाई ऊर्फ भालचंद्र तांबोळी आणि डॉ. अरिफ तांबोळी यांना उद्या गुरुवारी ( ता. 16) पनवेल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्याचे घवघवीत यश

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे अनेक नेते अटकेच्या फासात अडकले असतानाही ते निधड्या छातीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. मतदानाचा सूर्य मावळतीला गेल्यानंतर काही तासातच सीआयडीची कारवाई झाली आणि दोन मुख्य मोहरे अटकेच्या कारवाईत अडकले. 

पनवेल संघर्ष समितीने सातत्याने या संदर्भात पत्र व्यवहार आणि फोनद्वारे पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

बँक बुडीत प्रकरणात आरोपी असलेले अनेक माजी संचालक नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात उतरले होते. त्यामुळे कायदा वा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत होते. आरोपींना कायद्याचे भय उरले नसल्याने समितीने पुन्हा पाठपुराव्याला जोर लावला आणि मतदानाचा उत्सव होताच 48 तासात दोघांना अटक झाली. आता उर्वरित शेकापचे अन्य आरोपीही जात्यात असल्याचा दावा पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केला आहे.

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...